घरमहाराष्ट्रतुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील; एकनाथ शिंदेचा राणेंवर...

तुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील; एकनाथ शिंदेचा राणेंवर पलटवार

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेला (Shivsena) कंटाळले असून ते केवळ सहीपुरते मंत्री राहिले आहेत, असं मोठं वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं असून राणेंवर जोरदार पलटवार केला आहे. नारायण राणे जरी मंत्री असले तरी त्यांना धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत, असा दावा केला होता. हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच संमतीने मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो. नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत त्यामुळे याची त्यांना जाणीव असेल, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत पण धोरणात्मक निर्णय घेताना पंतप्रधानांची संमती घेऊनच तो घ्यावा लागेल, असं म्हणत राणे यांनी केलेलं वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांची शनिवारी २१ ऑगस्ट रोजी वसई-विरारमध्ये जन आशीर्वाद यात्रा होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत. त्यामुळे ते बिचारे कंटाळलेत. अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधत आहेत. एक दिवस फोन करेन आणि मार्ग दाखवेन,” असं वक्तव्य राणे यांनी केलं. पुढे राणे यांना तुमच्याकडे येणार आहेत का असा प्रश्न केला असता आले तर घेऊन टाकू आम्ही, असं देखील राणे म्हणाले होते.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -