Homeक्राइमNashik Crime : मुलाच्या लग्नास अवघे २० दिवस शिल्लक असतानाच आई-वडिलांची...

Nashik Crime : मुलाच्या लग्नास अवघे २० दिवस शिल्लक असतानाच आई-वडिलांची आत्महत्या

Subscribe

धाकट्या मुलाच्या लग्नाला अवघे २० दिवस शिल्लक राहिले असतानाच वयोवृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मुलाचे लग्न ठरल्यानिमित्त सर्व नातलग एका कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर दाम्पत्याने सर्वांसोबत जेवण केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.५) रात्री ११ वाजेदरम्यान टिळकवाडी येथील यश कृपा बंगल्यात घडली. दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना दाम्पत्याने आत्महत्या का केली. आत्महत्येच्या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. (Elderly couple commits suicide in bungalow)

रक्षा जयेश शहा (वय ५५) व त्यांचे पती जयेश शशिकलाल शहा (५८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांचा थोरला मुलगा रविवारी (दि. ५) रात्री ११ वाजेदरम्यान घरी आला. त्यावेळी त्याने रक्षा व जयेश यांनी विष प्राशन केल्याचे बघितले. त्याने दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचा सोमवारी (दि. ६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी यशकृपा बंगल्याची पाहणी केली. पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांना बंगल्यात संशयास्पद वस्तू व सुसाईड नोट आढळून आली नाही. पोलिसांनी नातलगांकडे चौकशी केली. मात्र, आत्महत्येच्या कारण समजू शकले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

दोन तास आधी घरात होते आनंदाचे वातावरण

शहा दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले आहेत. थोरला मुलगा विवाहित असून, बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा एका कंपनीत नोकरीला आहे. त्याचे २६ जानेवारी २०२५ रोजी लग्न होणार आहे. त्याच्या लग्नानिमित्त रविवारी (दि. ५) एका कार्यक्रमानिमित शहा यांचे नातलग आले होते. रात्री ८ वाजेदरम्यान सुमारे २० जणांनी बंगल्यात एकत्रित जेवण केले. त्यानंतर थोरला मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला. तर धाकटा मुलगा देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला गेला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास रक्षा यांनी थोरल्या मुलास कॉल केला. त्यावेळी त्याला आईचा आवाज हुंदका लागल्यासारखा आला, असा दावा नातलगांनी पोलिसांसमोर केला आहे. त्यानंतर तो पटकन घरी आला. त्याला समोरील दृश्य पाहून धक्काच बसला. त्याला आई-वडिलांनी विष प्राशन केल्याचे दिसले.