घरपालघरघरावर झेंडा लावताना छतावरून पडून वृद्ध इसमाचा मृत्यू

घरावर झेंडा लावताना छतावरून पडून वृद्ध इसमाचा मृत्यू

Subscribe

जव्हार – स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे. हर घर तिरंगा अभियानाने प्रेरित होऊन तालुक्यातील दुर्गम भागातील नांदगावपैकी राजेवाडी या गावातील 65 वर्षीय लक्ष्मण भाऊ शिंदे हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले असताना कौले फुटल्याने खाली पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – दक्ष नागरिकांमुळे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव बचावला

- Advertisement -

लक्ष्मण शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयात सेवा देऊन पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास, आपल्या राहत्या घरावर तिरंगा लावण्यासाठी शिंदे कौलावर चढले होते. पण, झेंडा लावत असतानाच कौले फुटल्याने शिंदे खाली जमिनीवर पडले. जखमी शिंदेंना तात्काळ जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुखापत गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे हर घर झेंडा उपक्रमातून नाहक बळी गेल्याची टीका जव्हार तालुक्यातून होत आहे.

हेही वाचा – संरक्षण भिंत पडल्यानंतर मुलुंड-ठाण्याचा रस्ता बंद

- Advertisement -

झेंडा लावून समस्या सुटणार नाहीत

देशाच्या पंतप्रधानांनी हर घर तिरंगा लावायचे आवाहन केले आहे. पण, मुळातच स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन देखील जव्हार तालुक्यामध्ये आजही अनेक गावांमध्ये रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्तेच नाहीत. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. शिक्षणाची आणि रोजगाराची वानवा आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूची संख्या भयावह आहे. भ्रष्टाचारामुळे शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचू शकलेल्या नाहीत. कित्येक कुटुंबीयांना हक्काचा निवारा नाही. रोजगाराअभावी स्थलांतर करण्याशिवाय आदिवासींना पर्याय नाही. केवळ झेंडा लावून समस्या सुटणार नाहीत, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -