मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच राज्यातील मिळालेल्या या निवडणुकांच्या निकालामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आज सकाळी माध्यमांशी बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, 1960 ते 2024 या कार्यकाळात पहिल्यांदाच असे यश राज्याला मिळाले आहे. तसेच या निकालानंतर अनेकांनी आक्षेप देखील घेतले आहेत. विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवरच सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे सांगत हा निकाल मान्य नसल्याचे म्हटले आहे. अनेकांच्या या आरोपानंतर आता ईव्हीएमच्या बॅटरीबाबत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले आहे. (How EVM battery is 99 percent even after voting election commission answer for the first time.)
हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : निवडणूक निकालात घराणेशाहीचा बोलबाला
मतदान झाल्यानंतर ईव्हीएम पॉवर पॅक 99% दिसत होते, ही बाब लक्षात आल्यानंतर 172 – अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती निवडणूक आयोगाला कळवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम पूर्ण दिवस वापरल्यानंतरही पॉवर पॅक 99% दाखवत होती. याबाबत एका उमेदवाराने आक्षेप घेतला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाचे ईव्हीएमच्या बॅटरीची रचना स्पष्ट सांगितली आहे. ईव्हीएम पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होतो, परंतु जेव्हा बॅटरीची क्षमता थ्रेशोल्डच्या खाली कमी होते, तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. म्हणून अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य आहे. तसेच अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar