मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त ठरलेल्या बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद, एक हैं तो सेफ हैं, धर्मयुद्ध या आणि इतर काही आक्षेपार्ह घोषणांची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. निवडणूक प्रचारातील या घोषणांसंदर्भातील जवळपास 15 अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या मुद्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आक्षेपार्ह घोषणा देणार्या नेत्यांवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Election Commission will take serious action on controversial slogans in election campaign)
हेही वाचा : Congress : सरकार आमचेच येणार, एकही आमदार फुटणार नाही; थोरातांना विश्वास
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात देण्यात आलेल्या घोषणांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतः हून मागवून घेतली आहे. तर काही आक्षेपार्ह घोषणांसंदर्भातील माहिती मुख्य निवडणूक अधिकार्यांनी स्वतः हून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार करताना जाहीर सभांमधून बटेंगे तो कटेंगे, अशी घोषणा दिली. या घोषणेला महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता, तर महायुतीचा घटक पक्ष आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेवर नाराजी व्यक्त केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान वोट जिहाद, धर्मयुद्ध असे शब्दप्रयोग केले होते. मुस्लीम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी मतदानाबाबत केलेल्या कथित वक्तव्याबाबतचे अहवालही केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. निवडणूक प्रचारात देण्यात आलेल्या या आक्षेपार्ह घोषणांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्येष्ठ विधिज्ञांकडून कायदेशीर मत तपासून घेणार आहेत. या नेत्यांकडून देण्यात आलेल्या घोषणांबाबत या विधिज्ञांकडून अहवाल मागवण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांचीही चौकशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी चांदिवलीत रोड शो केला आणि वरळीतही गेले. ठाण्यातील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ठाण्यातील निवासस्थानातून वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊ नका, अशा सूचना निवडणूक आयोगाने शिंदे यांना दिल्या होत्या. तरीही एकनाथ शिंदे ठाण्याहून निघाले. चांदिवलीत रोड शो केला आणि वरळीत गेले. रोड शोच्या विरोधात झालेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.