सोलापूर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार?

solapur krushi utpanna bajar samiti
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती

गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सभापतींसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल
जिल्हा निवडणूक कार्यालयाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून निवडणूक प्रक्रियेच्या संभाव्य तारखा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे सादर केल्या आहेत. मात्र त्याला प्राधिकरणाने अद्याप मंजुरी दिलेली नसल्याने बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशातच अनियमित कामकाज प्रकरणी बाजार समितीच्या माजी सभापतींसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाल्यामुळे हि निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत शेतक-यांना सहभागी
अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्य शासनाने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक नियुक्त केला आहे. सहा महिन्यानंतर निवडणूक होणे अपेक्षित असताना शासनाने बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत शेतक-यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी कायदा करण्यात आला.

न्यायालयीन वादामुळे बाजार समितीची निवडणूक पुढे
काही न्यायालयीन वादामुळे बाजार समितीची निवडणूक नेहमी पुढे पुढे ढकलली गेली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर त्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. सात – बारा उताऱ्यावर असणारी सर्वच नावे मतदार यादीत घेण्यात यावीत, अशी मागणी पुढे आली आणि हा वाद पुन्हा न्यायालयात गेला.

वारंवार मतदार याद्या बदलाव्या लागल्यामुळे विलंब
सरकारने दहा गुंठेपेक्षा अधिक क्षेत्र वाट्याला येत असलेल्या सर्वच शेतकऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. वारंवार मतदार याद्या बदलाव्या लागल्यामुळे या प्रक्रियेला खूपच विलंब झाला. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पुन्हा नव्याने प्रारूप व अंतिम मतदार यादी तातडीने प्रसिद्ध करण्यात आली. याबरोबरच जिल्हा निवडणूक कार्यालयाने निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम तयार करून सहकार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही आणि जरी आता मंजुरी मिळाली तरी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम मात्र पुढे जाणार हे निश्चित झाले आहे.