Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर Assembly Battle 2022 भाजपचाच झंझावात! उत्तर प्रदेश - गोव्यात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता

भाजपचाच झंझावात! उत्तर प्रदेश – गोव्यात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता

Subscribe

उत्तराखंड , मणिपूरमध्ये कमल फुलले , काँग्रेसचा पाचही राज्यात सपशेल धुव्वा ,गोव्याच्या विजयाने फडणवीसांचे वजन वाढले ,योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल गुरुवारी हाती आले. या 5 पैकी 4 राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा ठोकला आहे. तर पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसचा अक्षरश: सुपडा साफ केला आहे. कोरोना महामारीचे संकट, शेतकरी आंदोलन, स्थानिक हिंसाचार, भारत-चीन सीमावादाच्या मुद्यावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागलेल्या भाजपला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश गाठता येणार नाही, असे विश्लेषकांचे सारे अंदाज खोटे ठरवत भाजपने आपला झंझावात कायम असल्याचेच या निकालांवरून दाखवून दिले आहे.

सर्वात मोठी लढाई उत्तर प्रदेशची होती. येथे स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने ही लढाई जिंकली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगीराज येणार आहे. विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपने 265 जागा पटकावल्याने समाजवादी पक्षाला 133 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर बसपा तिसर्‍या आणि काँग्रेस चौथ्या स्थानी घसरले आहे.

- Advertisement -

गोव्यात 40 जागांपैकी बहुमताचा (21) आकडा गाठण्यासाठी भाजपला (19) अवघ्या दोन जागांची गरज आहे. येथेही 3 अपक्ष उमेदवरांनी साथ देण्याचे ठरवल्याने गोव्यात सलग दुसर्‍यांदा सत्ता स्थापनेचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. बहुमताचा 36 आकडा पार केल्याने या राज्यातही भाजप सलग तिसर्‍यांदा सत्तापदी बसणार आहे. तर, मणिपूरमधील 60 जागांपैकी 28 जागी विजयी होत भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे.

- Advertisement -

पंजाबच्या निकालाने पूर्ण राजकारण बदलून गेले आहे. 117 जागांपैक 92 जागा मिळवत आपने पंजाबमध्ये इतिहास रचला आहे. आम आदमी पक्षाच्या तडाख्यात दिग्गज नेत्यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत.

भाजपने विजयाचा चौकार लगावला – नरेंद्र मोदी

भाजपला चारही दिशेने जनतेचे आशीर्वाद मिळाले असून भाजपच्या नीतीवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. माता-भागिनींनी, तरुणांनी भाजपला समर्थन दिले आहे. हा मोठा संदेश आहे. यावेळी अनेकांनी पहिल्यांदाच मतदान केले. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित झाला. याच दिवसापासून आमची होळी सुरू झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले.

पाचपैकी चार राज्यांत भाजपचा दणदणीत विजय झाल्याने पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, काहीजणांनी उत्तर प्रदेशात भाजपला बदनाम केले. पण येथील जनतेने त्यांना धडा शिकवला. भारतीय मतदारांनी ज्याप्रकारे स्थिर सरकारला मतदान केले त्यावरून केंद्र आणि राज्यात एकच सरकार असल्याचे अधोरेखित झाले आहे. जिथे डबल इंजिनचे सरकार आहे तिथे विकास झाल्याचे मतदारांनी स्पष्टपणे अनुभवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आमची २०२४ ची तयारी सुरू – देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर महाराष्ट्रातल्या मतदारांचा भाजपवरील विश्वास वृद्धिंगत होईल. कार्यकर्त्यांचेही नीतीधैर्य वाढून जनतेच्या मनात बदल होईल. भाजपला पूर्णपणे निवडून आणण्यासाठी आमची २०२४ ची तयारी सुरू आहे, असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गोवा आणि उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी विधाने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. यासंदर्भात विजयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वेळेपेक्षा अधिक मतांनी भाजपचा गोव्यात विजय झाला आहे. याचा अर्थ असा होतो की, आम्ही मतांच्या विभागणीवरून निवडून आलो नाही, तर सकारात्मक मतांमुळे भाजप निवडून आले. याचा आनंद आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतसुद्धा विजयी झाले आहेत. गोव्यात आम्ही चांगले सरकार स्थापन करु. ज्या पद्धतीने आम्ही इतर राज्यात काम केले तसेच काम 2024 साठीही आमचे सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेची लढाई आमच्यासोबत नाही, तर त्यांची लढाई ही नोटाशी होती. हे यापूर्वीच मी सांगितले आहे. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती. परंतु त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. दोघांची मते एकत्र केली तरी ती नोटाहून कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेतली. त्या ठिकाणी त्यांना ९९ मते मिळाली आहेत. १०० मतेसुद्धा मिळू शकली नाहीत, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

अभी महाराष्ट्र भी तैयार है – शरद पवारांचे भाजप नेत्यांना आव्हान

उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजप नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचे म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. त्यावर ठीक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी भाजपला दिले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर बोलताना शरद पवार म्हणाले, पंजाबमध्ये झालेला बदल भाजपला अनुकूल नाहीच. मात्र, हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे. पंजाब असे एक राज्य होते जेथे काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे. आप हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. या पक्षाने दिल्लीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ला झाल्याचे दिसते, असेही शरद पवार म्हणाले.

त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले आहे. लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा.

प्रभावशाली पर्याय देण्यासाठी चर्चा
आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे, असे शरद पवार म्हणाले.

विजय पचवा, नाहीतर अजीर्ण  – संजय राऊत 

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढावली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना यूपीमध्ये भाजपच्या नोटांमुळे आम्हाला नोटापेक्षा कमी मते मिळाली. लोकांनी दिलेला विजय पचवा, अजीर्ण झाल्यास त्रास होतो, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर गुरुवारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला चांगला विजय मिळाला आहे. राजकारणामध्ये ज्यांचा विजय होतो त्यांचे अभिनंदन करण्याची आपली परंपरा आहे. ज्या- राज्यात ज्या पक्षाचा विजय झाला आहे. त्यांचे अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. समाजवादी पक्षापेक्षा काँग्रेस चांगले काम करेल, अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी झाली, असे संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशात भाजपच्या नोटांमुळे आम्हाला नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. भाजपला मोठा विजय मिळाला आहे. पराभव पचवणे सोपे असते. पण काही लोकांना विजय पचवता येत नाही. यामुळे मतदारांनी जो विजय दिला आहे. तो विजय पचवा नाहीतर सूडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, इतकेच सांगतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत घेतले असते तर चांगला परिणाम दिसला असता. काँग्रेसने आता आपल्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. तसे झाले असते तर नक्की फायदा झाला असता, असेही संजय राऊत म्हणाले.

गोव्यात सरकार स्थापनेचा दावा

गोवा विधानसभा निवडणुकीत 19 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुमतासाठी एक ते दोन जागा कमी पडत असतानाच गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अ‍ॅलेक्स रेजिनाल्ड या 3 अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे. गोवा भाजपने गुरुवारी संध्याकाळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

माझ्या विजयाचे श्रेय माझे कार्यकर्ते आणि पक्षाला जाते. मी नसतानाही त्यांनी काम केले. गोव्याच्या विकासासाठी जनतेचा कौल पुन्हा भाजपला मिळाला आहे. विजयानंतर अपक्षांना आम्ही सोबत घेऊन सरकार स्थापन करणार. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत राहू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

भगवंत मान घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंजाब विधानसभेच्या निवडणूक निकालात ११७ जागांपैकी सुमारे ९० जागा जिंकत आम आदमी पक्षाने प्रस्थापितांना मोठा झटका दिला आहे. ‘आप’च्या यशानंतर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांनी सत्तास्थापनेचा दावा केला असून शहीद भगतसिंग यांच्या पंजाबमधील नवानशहर जिल्ह्यातील खटकरकालन या गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली. सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंग आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम आदमी पक्षाने काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांना धूळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनीदेखील 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिद्दूसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांचा तर त्यांच्या दोन्ही मतदारसंघात पराभव झाला आहे. आतापर्यंत सत्ता भोगलेल्यांनी सामान्यांना गरीब ठेवले आहे. त्यांनी फक्त सामान्यांना लुटण्याचे काम केले. त्यामुळे पंजाबमध्ये सत्तेत येऊ नये हे त्यांचे स्वप्न होते. मात्र, मतदारांनी त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आता ही क्रांती संपूर्ण देशात पसरेल, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

संपूर्ण देशात क्रांती होईल
दहशतवादी मी नव्हे देश लुटणारे दहशतवादी आहेत. केजरीवाल हे देशभक्तच आहेत, हे आज पंजाबच्या जनतेने दाखवून दिले. आधी दिल्ली आता पंजाब हळूहळू संपूर्ण देशात क्रांती होईल. सर्वसामान्य उमेदवारांनी दिग्गज उमेदवारांना मात दिली. आपला आव्हान देऊ नका. देशातील सर्वांनी आता आम आदमी पार्टीत प्रवेश करावा.
-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

जनतेसाठी आपण काम करत राहू
जनमताचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेचा कौल मिळवणार्‍यांना शुभेच्छा आहेत. निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचा आभारी आहे. या निवडणुकीतून आपण धडा घेऊया आणि जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारे काम करूया.
-राहुल गांधी, खासदार, काँग्रेस

मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरूक आणि सतर्कतेने कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे पाईक’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील.
– अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पार्टी

वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली
उत्तर प्रदेशच्या जनतेने जातीयवाद, परिवारवादाला तिलांजली दिली आणि पुन्हा एकदा विकास तसेच सुशासनाला मतदान केले. भ्रामक प्रचाराला बळी न पडता मोदींवर आणि भाजपवर विश्वास टाकला. मागच्या ५ वर्षांपेक्षा अधिक वेगाने आता विकास होईल.
-योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला मोठा विजय 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक मोठा संकेत आहे. लोकांना सुशासन हवे आहे. जातीवादाऐवजी विकासाचे राजकारण हवे आहे.नरेंद्र मोदी ,पंतप्रधान 

- Advertisment -