घरमहाराष्ट्रElections 2024 : भाषा युतीची, तयारी स्वबळाची! लोकसभा, विधानसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख...

Elections 2024 : भाषा युतीची, तयारी स्वबळाची! लोकसभा, विधानसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर

Subscribe

मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेली लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेची (Maharashtra assembly) निवडणूक युती म्हणून एकत्र लढविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने देत असताना भाजपाने मात्र दोन्ही निवडणुका (Elections 2024) स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. राज्यातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून भाजपाने गुरुवारी शतप्रतिशतचे स्पष्ट संकेत दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेपासून शिंदे आणि फडणवीस हे, भाजपा – शिवसेना (शिंदे गट) राज्यातील सर्व निवडणुका युती म्हणून लढविणार असल्याचे सांगत आहेत. मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका युती म्हणूनच लढविण्याचा पुनरुच्चार दोघांनी अनेकदा केला आहे. एकीकडे, एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र, भाजपाने 48 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित करून वातावरण निर्मिती चालवली आहे.

- Advertisement -

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, त्याचवेळी त्यांनी आम्ही आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपाबरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केल्याचेही ते म्हणाले.

भाजपाने एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत कांबळे, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल नार्वेकर प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रसाद लाड यांची नेमणूक केली आहे. तर मुंबई उत्तरसाठी आमदार योगेश सागर, मुंबई उत्तर पश्चिमसाठी आमदार अमित साटम, मुंबई उत्तर पूर्वसाठी भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर मध्यसाठी पराग अळवणी, मुंबई दक्षिणसाठी मंगलप्रभात लोढा, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासाठी विनय सहस्त्रबुद्धे, पालघरसाठी नंदकुमार पाटील, नाशिकसाठी केदा नानाजी अहेर, दिंडोरीसाठी बाळासाहेब सानप, शिर्डीसाठी राजेंद्र गोंदकर, अहमदनगरसाठी बाळासाहेब वाकडे, जळगावसाठी डॉ. राधेश्याम चौधरी, रावेरसाठी नंदू महाजन, धुळ्यासाठी राजवर्धन कदमबांडे तर, नंदुरबारसाठी तुषार रंधे यांच्या नावाची निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

नांदेडमध्ये 10 जून रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा
मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरू असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे 10 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून 3 कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -