घरलोकसभा २०१९खडाजंगीबारामतीत दोन माहेरवाशिणींमध्ये रंगणार कलगीतुरा

बारामतीत दोन माहेरवाशिणींमध्ये रंगणार कलगीतुरा

Subscribe

२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही पवार घराण्याच्या राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळे बारामतीमधून निवडून आल्या होत्या, मात्र त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना बर्‍यापैकी टक्कर दिली होती. त्यावेळी जरी ते युतीचे उमेदवार होते, तरी त्यांचे कपबशी चिन्ह होते. आता २०१९मध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले, ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही सामावेश आहे. या ठिकाणी युतीने जोरदर टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा बारामतीत घड्याळ विरुद्ध कमळ अशी थेट लढत पहायला मिळणार आहे. दोन्ही माहेरवाशिणीमधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांनीही हा मतदारसंघ चांगला बांधून ठेवला आहे. बारामती म्हणजे सुप्रिया सुळे अशी ओळख निर्माण झाली आहे. २०१४मध्ये बारामतीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली नव्हती, मात्र यावेळी मोदी यांची रॅली आयोजित करण्याचा प्रयत्न आमदार कुल करणार आहेत. कांचन कुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून कुल कुटुंबीय २००९ पासून दुरावले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांच्याविरोधात काम केल्याने पराभव पत्करावा लागल्याची नाराजी होती. त्यामुळे २०१४ मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. कांचन कुल ह्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत. कुल कुटुंबीय १९६२ पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे १९९० ते २००१ दरम्यान आमदार होते त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे २०१४ साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

सध्या पवार कुटुबांमध्येच आता सत्तेची महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. कालपर्यंत शरद पवार यांनी माढामधून स्वत: निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते, परंतु अचानक अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यावर पवार यांनी तीन-तीन लोकसभा उमेदवारी एकाच घरात देणे शक्य नाही, म्हणून पार्थ यांच्या उमेदवारीला शरद पवारांनी पूर्णविराम दिला. सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या मताचे जोरदार समर्थन केले, मात्र अजित पवारांनी पक्षांतर्गत दबाव वाढवून अखेर पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी मिळवून दिली, त्या वेळी शरद पवारांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेत पार्थ पवारांच्या उमेदवारीला संमती दिली. अशा प्रकारे सध्या पवार घराण्यात अंतर्गत कलह आहे. यदाकदाचित पार्थ पवारांना प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध झाला, तर त्याचे परिणाम पक्षातील अजित पवार गटाकडून सुप्रिया सूळे यांनाही भोगावे लागतील, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी कुटुंबातील कलह डोकेदुखी ठरू शकते.

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदारसंघात एका बाजुला ग्रामीण मतदार आहे तर दुसर्‍या बाजुला खडकवासला, बालेवाडी, आयटी हब हिंजवडी, धनकवाडी आणि चांदनी चौक या भागात शहरी मतदार आहेत. यात दौंड विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे तर इंदापूर, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदरमध्ये शिवसेना, भोरमध्ये काँग्रेस तर खडकवासलामध्ये भाजपचा आमदार आहे.

1957 पासून १९८० पर्यंत बारामती लोकसभामध्ये सतत नेतृत्त्व बदल होत आला आहे. १९५२ ते १९७१ पर्यंत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. १९७७ मध्ये भारतीय लोक दल पक्षाने जागा जिंकली. पुन्हा १९८०ला काँग्रेस विजयी झाली. पुढे शरद पवारांनी (एस) काँग्रेसच्या माध्यमातून विजय मिळवला. तिथपासून मात्र २०१४ पर्यंत या लोकसभा मतदारसंघ पवार घराण्याकडेच राहिला. १९९६ ते २००४ पर्यंत शरद पवारांनी येथे विजय मिळवला आणि २००९, २०१४ मध्ये सुप्रिया सुळे ह्या बारामतीमधून जिंकत आल्या आहेत. २०१९मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -