‘मुंबईच्या धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही सुरू होणार ‘इलेक्ट्रिक बस”

Electric Buses will start in state in major cities said aditya thackeray
'मुंबईच्या धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही सुरू होणार 'इलेक्ट्रिक बस''

बेस्ट उपक्रमात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस गाड्यांचा ताफा वाढवण्यात येत आहे. मुंबईच्या धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ सेवा सुरू करण्यात येईल, असे सुतोवाच राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी मुंबईत एका कार्यक्रमाप्रसंगी केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या वरळी डेपोमधील बस ताफ्यात रविवारी पर्यावरणपूरक ६० इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. या बसगाड्यांचे लोकार्पण पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली.

पर्यावरणपूरक वाहतूकसेवा आणि सुविधा वाढवण्यासाठी बेस्ट कसोशीने प्रयत्न करत आहे. बेस्टच्या परिवहन विभागात यापुढे टप्प्याटप्पाने सर्व बसगाड्या या इलेक्ट्रिक स्वरूपातील करण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र हे पर्यावरण संरक्षणासाठी जलद गतीने काम करत आहेत, असे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाव्यवस्थापक यांची विशेष प्रशंसा केली.

याकार्यक्रमाप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, सुनिल अहिर, बबन कनावजे, नगरसेवक संतोष खरात, नगरसेविका हेमांगी वरळीकर, बेस्टचे माजी अध्यक्ष सुनिल शिंदे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख एरिक सोल्हेम, नॉर्वेचे कॉन्सुलेट अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

इलेक्ट्रिक बसगाड्या पर्यावरणपूरक – महाव्यवस्थापक

पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या वापरामुळे वातावरणातील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक बसगाड्या पर्यावरणपूरक आहेत, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. यावेळी, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख एरिक सोल्हेम यांनी देखील बेस्टच्या दोन्ही पर्यावरण पूरक उपक्रमांचे तोंडभरून कौतूक केले.

विमानतळावरुन विशेष बससेवा

बेस्ट परिवहन विभागाने, विमानतळापासून वांद्रे कुर्ला संकुल आणि फोर्टपर्यंत विशेष बससेवा सुरू केली आहे. दर ४५ मिनीटांंनी या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

बेस्ट उपक्रमाध्या दुसऱ्या लकी ड्रॉमधील विजेत्यांना बक्षीस

या कार्यक्रमाप्रसंगी, बेस्ट उपक्रमाने वीजदेयकांचे ऑनलाईन प्रदान करणाऱ्या वीज ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या दुसऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. बेस्टच्या प्रत्येक प्रभागातील वीज ग्राहकांना मोबाईल, मिक्सर ग्राईंडर, फूड प्रोसेसर, डिनर सेट, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर यासारखी बक्षिसे देण्यात आली.