नव्या वर्षात वीजग्राहकांना बसणार मोठा ‘शॉक’, दरवाढीची शक्यता

electricity
electricity

नव्या वर्षात राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे. महावितरण कंपनीने सरासरी २ रुपये ३५ पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी करण्यात आली आहे. या याचिकेवर निर्णय होणे बाकी आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून या प्रस्तावावर निर्णय लांबण्याची शक्यता आहे.

मागील काळात महावितरण कंपनीने सरासरी प्रति युनिट १.०३, तर महापारेषण कंपनीने ३२ पैसे असा एकूण १.३५ रुपये प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव आधीच सादर करण्यात आला. तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून विदेशी कोळसा आयात करुन वीजपुरवठा केल्याच्या मोबदल्यात २२ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे पैसे इंधन अधिभाराच्या माध्यमातून वसूल करण्याचे निर्देश दिले होते.

महावितरणकडून बहुवर्षीय दरनिश्चिती विनियमानुसार तिसऱ्या वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत वीजदरासंदर्भात फेरआढावा घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात येते. त्यानुसार महावितरण कंपनीकडून वीजदरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु या निर्णयाला सामान्य नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य वीजग्राहक संघटनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यातील सर्व वीज ग्राहकांनी प्रचंड संख्येने सूचना व हरकती नोंदवून करावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी यानिमित्ताने केले आहे.


हेही वाचा : विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली, तीन उमेदवारांची नावे जाहीर