ग्राहकांचे समाधान होईपर्यंत वीज जोडणी कापू नका – एमईआरसी 

power disconnection

लॉकडाऊनच्या काळात घरगुती वीज ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारींचा उसळलेल्या भडक्यावर राज्य वीज नियामक आयोगाने थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांना वीज बिलाच्या तक्रारीचे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी विविध पर्याय दिले आहेत. महत्वाचे म्हणजे जोपर्यंत वीज बिलाबाबत जोपर्यंत समाधान होत नाही तोवर ग्राहकांची वीज जोडणी कापू नका असे राज्य वीज नियामक आयोग (एमईआरसी) ने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांना वीज कंपन्यांकडून पाठवण्यात आलेल्या वीज बिलाबाबत तक्रारी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी उपविभागीय तसेच विभागीय पातळीवर डेस्क तयार करण्याचे आवाहन वीज कंपन्यांना करण्यात आले आहे. तसेच वीज ग्राहकांना आयजीसीआर, सीजीआरएफ तसेच विद्युत लोकपाल यासारख्या ठिकाणी वीज तक्रारी तसेच शंकांचे निरसन करता येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचे वीजबिल हे सरासरीपेक्षा दुप्पट असेल अशावेळी ग्राहकांना सुलभ हप्त्यांमध्ये हे वीजबिल भरता येणार आहे. तसेच वीज बिल भरले नाही म्हणून ग्राहकांच्या शंकाचे निरसन होईपर्यंत वीज पुरवठा खंडित करता येणार नाही.

ऑटोमॅटिक मीटर रिडिंगचे मीटर बसवण्यासाठीही आयोगाने वीज कंपन्यांना अधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये सध्याचे एएमआर मीटर बसवण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे असे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. म्हणूनच आयोगाने येत्या कालावधीमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर कंपनीला येत्या दिवसांमध्ये एएमआर मीटर बसवण्याचे आदेश दिले आहेत. एईएमएलला ७ लाख मीटरचे उदिष्ट तर टाटा पॉवर कंपनीला ६६ हजार मीटर बसवण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीला महावितरणने संपुर्ण राज्यात ६ लाख ११ हजार ५३७ एएमआर मीटर, एईएमएलने ५७० मीटर, टाटा पॉवरने २३ हजार ४४६ मीटर आणि बेस्टने १९३ मीटर बसवले आहेत.