अकरावीची CET २१ ऑगस्टला, ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या

प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असेल.

Eleventh CET on 21st August, find out the nature of offline exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल २८ मे,२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्‍चित करण्यात आला होता. या परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.

सीईटीची परीक्षा परीक्षा ही राज्य मंडळाअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील २०२१-२२ मधील ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती महाराष्ट्र बोर्डाच्या (मंडळाच्या) अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे.

अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी अधिक सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाकडून कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ११ वीची सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारावर विद्यार्थ्यांना इच्छुक महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. सीईटीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाटी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तसेच त्यांना परीक्षेसाठी हॉल तिकीटही ऑनलाईन देण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.
तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.
त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.