ठाणे पालिकेच्या अत्यावश्यक विभागातील कर्मचारी वाऱ्यावर; ठेकेदाराकडून तुटपुंजे वेतन

आग, पाऊस, अपघात, पडझड अशा आपत्तीकाळात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. तुटपुंजे वेतन, विम्याचे नसलेले कवच, सुरक्षिततेचे अपुरे साहित्य अशा समस्यांना तोंड देत लाखो ठाणेकरांचा बचाव या कर्मचाऱ्याकडून केला जातो.

Thane Municipal Corporation

ठाणे : आग, पाऊस, अपघात, पडझड अशा आपत्तीकाळात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. तुटपुंजे वेतन, विम्याचे नसलेले कवच, सुरक्षिततेचे अपुरे साहित्य अशा समस्यांना तोंड देत लाखो ठाणेकरांचा बचाव या कर्मचाऱ्याकडून केला जातो. (Employees of the essential department of Thane Municipality on the wind Meager wages from contractors)

अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांना ठोक मानधन तत्वावर सेवेत सामावून न्याय मिळवून द्यावा तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. याप्रश्नी मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी अतिरिक्त आयुक्तांची भेटही घेतली असून त्यांनी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महापालिकेत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. मुख्य नियंत्रण कक्ष असलेल्या या विभागात २४ x ७ कर्मचारी कार्यरत असतात. या विभागामध्ये डयुटी ऑफिसर, शिफ्ट इन्चार्ज, संगणक चालक, टेलिफोन व वायरलेस ऑपरेटर या पदावर कंत्राटी कर्मचारी मागील कित्येक वर्षापासून कार्यरत आहेत.

पावसाळयात दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदत करणे, घटनास्थळी त्वरीत मदत पोहचवणे, दरड कोसळणे, वादळ, वीज कोसळणे, लिफ्ट दुर्घटना, घरात पाणी शिरणे, झाड पडणे, जमीन खचणे अशा अनेक प्रसंगी नागरिकांना या विभागामार्फत मदत केली जाते. कोविड काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांना सर्वतोपरी मदत या विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत पुरवली. मात्र या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेने ठेकेदाराला दिलेल्या रकमेच्या तुलनेत अगदीच तुटपुंजे वेतन दिले जाते.

सुरक्षेकरिता लागणारे साहित्य, विमा कवच आदी बाबींची पूर्तता करण्यात येत नाही. त्या पुरवून या सर्व कर्मचाऱ्यांना हक्काच्या सोयीसुविधा देण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदनाद्वारे केली. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असेही पाचंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गरज सरो, वैद्य मरो

ठाणे शहराबाहेर देखील एखादी दुर्घटना घडल्यास या विभागातील कर्मचाऱ्यांकडून मदतकार्य केले जाते. या सर्व जोखमीच्या कामाच्या बदल्यात त्यांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. गरज सरो, वैद्य मरो अशी पालिका प्रशासनाची स्थिती असून याप्रश्नी आज अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले. हेरवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून कारवाईचे आश्वासन दिले आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला.


हेही वाचा – केरळच्या मॉलमधील अभिनेत्रीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; होणार पोलीस चौकशी