घरमहाराष्ट्रसलाईन, इंजेक्शन पाहिजे.. द्या पैसे!

सलाईन, इंजेक्शन पाहिजे.. द्या पैसे!

Subscribe

सरकारी दवाखान्यात लुटीचा नवा फंडा

सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना प्राथमिक उपचार विनामूल्य मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यात नाममात्र नोंदणी शुल्क ५ किंवा १० रुपये घेऊन रुग्णांवर विनामूल्य उपचार करून औषधे दिली जातात. मात्र शासनाच्या या योजनेला छेद देत आरोग्य सभापतींच्या तालुक्यातच रुग्णांकडून सलाईन आणि इंजेक्शनसाठी चक्क पैसे घेऊन रुग्णांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर याबाबत आरोग्य विभागाने कानावर हात ठेवले आहेत.

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेने खांडस, नेरळ, मोहिली, कळंब, आंबिवली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहेत. येथे केस पेपरसाठी ५ किंवा १० रुपये शुल्क आकारले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय आणि एक उप जिल्हा रुग्णालयही आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग असून, दुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हा एक उत्तम पर्याय जरी असला तरी आंबिवली आरोग्य केंद्रात उपक्रमालाच तिलांजली देण्यात येत आहे.

- Advertisement -

या आरोग्य केंद्रात ५ रुपये केस पेपर व्यतिरिक्त रुग्णांकडून सलाईन आणि इंजेक्शन यासाठी वेगळे पैसे उकळले जात असल्याचे सत्य बाहेर आले आहे. इंजेक्शन हवे असेल तर 20 रुपये आणि सलाईन लावायचे असेल तर 60 रुपये असे ‘दर’ असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले. आम्ही खूप लांब राहत असल्याने कमाईचे योग्य साधन नाही. त्यामुळे खासगी दवाखाना परवडत नाही. सरकारी दुसरा दवाखाना कशेळे येथे आहे. तेथे जावे तर रिक्षा किंवा बसला खर्च हा करावाच लागणार म्हणून नाईलाजास्तव आंबिवलीच्या आरोग्य केंद्रात पैसे द्यावे लागत असल्याचे हतबलता एका रुग्णाने बोलून दाखविली.

आंबिवली गाव अतिशय दुर्गम भागात आहे. त्या परिसरात अनेक छोटी-मोठी गावे, वाड्या, पाडे असून, त्यांना वैद्यकीय सेवेसाठी आंबिवली केंद्रावरच अवलंबून राहावे लागते. तसेच दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी उत्पन्नाचे विशेष असे काही साधन नाही. शेती, मोलमजुरी, फार्महाऊसवर माळीकाम, रखवालदार अशी कामे करून रहिवासी आपली उपजीविका चालवीत आहेत. तेव्हा शासनाच्या या आरोग्य सेवेचा त्यांना लाभ होण्याऐवजी त्यातून त्यांची लूट होत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

आंबिवली आरोग्य केंद्रात औषधेही गायब आहेत. औषधांचा साठा फलक अनेक महिने अद्ययावत केलेला नाही. त्यामुळे केंद्रात औषधें आहेत असे वाटत असताना तेथे सर्दी, खोकला यासाठीची औषधेही उपलब्ध नाहीत. याबाबत डॉक्टर आणि कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती असलेले सुधाकर घारे यांच्या तालुक्यातच ही लूट सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, यातील दोषींना कारवाईचा बूस्टर डोस देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेकदा आरोग्य केंद्रात औषधें नसतात. त्यावेळी औषधे का देत नाहीत, असे रुग्ण विचारतात. आताही दवाखान्यात कफ सिरप नाही. अनेक औषधे नाहीत. बाहेरून रुग्णांना गोळ्या औषधे आणायला सांगितली की बाहेरून का, असे सवाल रुग्ण विचारतात. तर आम्ही कमी पैशात बाहेरून आणून दिली तरी आम्हाला विचारणा होते. अखेर आम्ही करायचे तरी काय?
– स्वप्नील बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी, आंबिवली आरोग्य केंद्र

रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत सलाईन आणि इंजेक्शनचे पैसे घेतले असल्याच्या तक्रारींवर चर्चा झाली. त्यामुळे पुढे असे होणार नाही, याची दखल घेण्याची सक्त सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू.
– सी. के. मोरे, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -