आज महाराष्ट्र बंद: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची जोरदार तयारी; मनसे, भाजपसह व्यापार्‍यांचा बंदला विरोध

उत्तर प्रदेशातील लखिमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील सत्ताधारी आघाडीने सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमधून सर्व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याने दैनंदिन जनजीवनावर फारसा परिणाम होणार नाही. या बंदला भाजप, मनसे हे राजकीय पक्ष आणि व्यापार्‍यांनी विरोध दर्शवला आहे. कोरोना लॉकडाऊन नंतर दुकाने नुकतीच उघडली असून अजून आर्थिक घडी बसलेली नाही. त्यामुळे बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय मुंबई, पुण्यातील व्यापार्‍यांनी घेतला आहे. तर काही ठिकाणी व्यापारी काळीफीत बांधून बंदला पाठिंबा देणार आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बंद कडकडीत राहणार असल्याचे आणि जनतेला या बंदला स्वत:हून पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बंदमध्ये तीनही पक्ष उतरल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह अनेक शहरातील व्यवहार सोमवारी थंडावण्याची शक्यता आहे.

बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरूच राहतील. मात्र, आमचा शेतकर्‍यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन मुंबई व्यापारी संघाचे पदाधिकारी विरेन शहा यांनी केले आहे. कोरोनानंतर बर्‍याच वेळाने दुकाने सुरू झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणेसुद्धा जिकीरीचे झाले आहे. आमचा शेतकर्‍यांना पाठिंबा आहे, असे सांगत विरेन शहा यांनी मुंबई व्यापार संघाची भूमिका मांडली.

मनसेचा विरोध
लखिमपूर खीरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकारमधीलच पक्षानी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमके कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेली दीड-दोन वर्षे व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतेय त्यात असे बंद व्यापार्‍यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचाय तर अन्य मार्ग आहेत. त्याचा अवलंब करावा, बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गार्‍हाणं मांडायचं तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामिल न होता व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालू ठेवावीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.

भाजप विरोध करणार
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केला आहे. लखीमपूरमधील एका घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. जर कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.