घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराज ठाकरेंच्या दौर्‍यानंतरही पदाधिकारी संभ्रमात; तीन दिवसांत कार्यकर्त्यांना अवघा दीड तास

राज ठाकरेंच्या दौर्‍यानंतरही पदाधिकारी संभ्रमात; तीन दिवसांत कार्यकर्त्यांना अवघा दीड तास

Subscribe

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदीर्घ काळानंतर केलेल्या नाशिक दौर्‍यात संघटनेला बळकटी, पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि नाशिककरांना दिलासा मिळण्याची मोठी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र पदरी केवळ निराशाच पडली. या तीन दिवसांच्या दौर्‍यात राज ठाकरे यांनी पक्षासाठी अवघा दीड तासांचा वेळ दिला. त्यामुळे दौर्‍याचा उद्देश आणि फलित नेमके काय, असा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.

राज ठाकरे यांच्या दौर्‍यानिमित्ताने का होईना, संघटनेत आलेली मरगळ दूर होईल, स्थानिक मुद्द्यावर राज आपल्या शैलीत प्रशासनाला शालजोडे देतील, पक्षातील गटबाजी, शहराध्यक्षपदाचा गोंधळ, सत्ताकाळात उभारलेल्या प्रकल्पांची झालेली दूरवस्था, आगामी निवडणुका, लोकांमध्ये जाण्यासाठी उपक्रम याबाबत काहीतरी ठोस दिशा मिळेल, अशी आस लागली होती. राज यांच्यासोबत आलेल्या सहकार्‍यांनी कार्यकर्त्यांना संघटनेतील पदाच्या जबाबदार्‍या आणि निवडणुकीला सामोरे जात असताना काय करायला हवे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. त्यामुळे राज यांच्याकडूनही ठोस काहीतरी दिशा मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र, अनेक प्रश्न प्रलंबित ठेऊनच राज यांनी दौरा आटोपला.

- Advertisement -

सत्ताकाळात उभारलेले प्रकल्प धूळखात

२०१२ ते २०१७ या पंचवार्षिक काळात नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता होती. प्रारंभीच्या काळात कोणतेही ठोस काम होताना दिसत नाही, अशी ओरड नाशिककरांकडून होऊ लागल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून नाशिकमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून बॉटनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण असे प्रकल्प उभारले. हे सर्व प्रकल्प पक्षाची जमेची बाजू आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून या प्रकल्पांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र, खुद्द मनसेकडूनच दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

प्रशासकीय राजवटीतही मरगळ

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात मनसे व भाजपची जवळीक होत असल्याचे चित्र होते. त्याचेच पडसाद म्हणून भविष्यात महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेने मनसेने पालिकेतील तात्कालीन सत्ताधारी भाजपविरोधात कोणतेही आंदोलन न करण्याची भूमिका घेतली होती. खरेतर मनसे काळातील कामे व भाजप काळात चाललेला कारभार यावरून रान उठवण्याची संधी असताना मनसेने कोणतीही भूमिका घेतली नाही. आतातर दोन वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. तरीही मनसेचे पदाधिकारी शांत आहेत. मूलभूत नागरी प्रश्नांवर इतर पक्ष आक्रमक भूमिका घेत असताना मनसे मात्र मौनात असल्याचे दिसून येते. मध्यंतरी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा अद्याप प्रलंबित आहे. राज यांच्या दौर्‍यात दातीर यांना रेड किंवा ग्रीन सिग्नल दिला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, हा प्रश्नही तसाच ठेवून राज माघारी परतले.

- Advertisement -

अमित ठाकरे देणार अधिक लक्ष?

वर्षभरापूर्वी अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी महाराष्ट्र दौरा असल्याने तसेच, निवडणुका लांबल्याने त्यांच्या सातत्याने होणार्‍या नाशिक दौर्‍यात खंड पडला. मात्र, स्वतः अमित यांनी नाशिककडे जातीने लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्याच अनुषंगाने आठवडाभरातच पुन्हा अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

पुढील महिन्यात १६ तारखेला दूतांचा आढावा

राज ठाकरे यांचा दौरा असेल तेव्हा अतिशय उत्साहात असलेली संघटना नंतर मात्र निद्रितावस्थेत जाते. याबाबत राज यांनी ’त्याचीच झाडाझडती घेऊन आगामी काळात पक्ष जिवंत दिसेल’ असे म्हटले होते. संघटना सतत सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने थेट राज ठाकरे यांचे काही दूत बैठकीत झालेल्या सूचनांवर काय काम झाले याचा वारंवार दौरा करून आढावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या दौर्‍यात देण्यात आलेल्या सूचनांचा आढावा पुढील महिन्यात १६ ते १८ या तीन दिवसांत घेतला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -