रत्नागिरी : शिवसेना आमदार अपात्राता प्रकरणी उद्या बुधवारी 10 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या या प्रकरणाचा अंतिम निकाल देतील. उद्याचा निकाल हा शिवसेनेच्या (शिंदे गट) बाजूने लागण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली. उद्याचा निकाल काहीही असला तरी आज (ता. 09 जानेवारी) मात्र, ठाकरे गटातील आमदारांवर आणि खासदारांवर एसीबी, ईडी आणि प्राप्तिकर विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. एकीकडे गेल्या पाच-साडेपाच सातांपासून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घराची ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे. तर त्यानंतर खासदार राजन विचारे यांच्या घरी सुद्धा प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. पण या सगळ्यात आधी सकाळीच आमदार राजन साळवी यांना अलिबाग ACB कार्यालयातून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची उद्या (ता. 10 जानेवारी) चौकशी होणार आहे. (“Even if arrested…”, Rajan Salvi’s firm stance on ACB probe)
हेही वाचा… शिंदेंच्या खासदार Bhavana Gawali यांच्या अडचणीत वाढ, प्राप्तिकर विभागाने पाठवली दुसरी नोटीस
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उद्या राजन साळवी, त्यांचे बंधू, पुतण्या आणि वहिनीची चौकशी करण्यात येणार आहे. परंतु, साळवींच्या वहिनींची तब्येत बरी नसल्याकारणाने त्या या चौकशीला उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. परंतु, या चौकशीमुळे राजन साळवी यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. एसीबीने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, तर काही दिवसांपूर्वी त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते. आता उद्या पुन्हा राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येणार आहे. पण त्याआधी त्यांनी या चौकशीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसार माध्यमांसमोर राजन साळवी म्हणाले की, भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, उद्या माझी आणि माझ्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी आहे. भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. तसेच, मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही. तर, उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता, त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजूने निर्णय देतील, असा विश्वासही राजन साळवी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.