Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी..., मोहित कम्बोज यांचे सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर

सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी…, मोहित कम्बोज यांचे सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काडतुसाची भाषा केली असेल, तर उद्धव ठाकरे हे तोफ आहेत, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले होते. त्याला भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी, तोफ होण्यासाठी निधडी छाती हवी, असे प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाण्यात मारहाण झाली. त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सुसंस्कृत ठाणे गुंडांचे ठाणे झाले आहे. अतिशय फडतूस गृहमंत्री आपल्या राज्याला लाभले आहेत. पदासाठी त्यांचा लाळघोटेपणा सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर, मी फडतूस नाही तर काडतूस आहे. झुकेगा नहीं, घुसेगा साला, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला होता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ ठाण्यात महाविकास आघाडीचा ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला होता. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे मी फडतूस नाही तर काडतूस आहे असा दम भरत आहेत. तसेच कुठे घुसेल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, असेही सांगत आहेत. त्या देवेंद्र भाऊंना माझे आवाहन आहे की, तुमच्या घरात एक बाई 2016पासून घुसली होती, तिचा आधी बंदोबस्त करा, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केला. त्यासोबतच ठाकरी बाणा ही तोफ आहे आणि तोफेसमोर काडतूसाचा निभाव लागू शकणार नाही, असाही टोला त्यांनी फडणवीसांना लगावला होता.

- Advertisement -

त्याला आता भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुषमाताई, तोफ होण्यासाठी निधडी छाती हवी. सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी, फुसका बॉम्ब कधी तोफ बनू शकत नाही, असे त्यांनी ट्वीट करून सुनावले आहे.

- Advertisment -