मुंबई : थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. परंतु महावितरणाकडून नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 11 जानेवारी रोजी राज्यात 25 हजार 808 मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विजेची उच्चांकी मागणी नोंदवली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणाचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केला आहे. (Even in the dead of winter Mahavitaran supplies 25 thousand MW)
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना महावितरणाला दिल्या होत्या. तसेच यंदा मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढू शकते असा महावितरणाचा अंदाज आहे. याशिवाय उन्हाळ्यात विजेच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन महावितरणाने ग्राहकांच्या वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणाला आतापर्यंत वीज पुरवठा करता आला आहे.
हेही वाचा – Road Accident : गेल्या 3 वर्षांत रस्ते अपघातांमध्ये इतकी वाढ, चिंता वाढली
महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी आहे. 11 जानेवारी रोजी 25 हजार 808 मेगावॅटची उच्चांकी वीज मागणी महावितरणाकडे नोंदविली गेली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कारण यापूर्वी 7 फेब्रुवारी 2024 रोजी 25 हजार 410 मेगावॅट आणि 14 एप्रिल 2022 रोजी 25 हजार 144 मेगावॅट अशी उच्चांकी वीज मागणी नोंदविली गेली होती.
असा झाला पुरवठा
दरम्यान, विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीजखरेदीचे करार केले होते. त्यानुसार 11 जानेवारी रोजी उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणाने महानिर्मितीकडून 6 हजार 996 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पांकडून 5 हजार 252 मेगावॉट आणि खासगी प्रकल्पांकडून 5 हजार 733 मेगावॉट वीज उपलब्ध करण्यात आली होती. याशिवाय जलविद्युत प्रकल्पांमधून 2009 मेगावॉट, सौरऊर्जा प्रकल्पांमधून 3093 मेगावॉट, पवनऊर्जा प्रकल्पांतून 228 मेगावॉट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पांतून 2 हजार 498 मेगावॉट वीज घेतली होती.
हेही वाचा – Aaditya Thackeray : नेत्यांच्या दौऱ्यांसाठी मुंबईकरांना का वेठीला धरता, वाहतुकीतील बदलामुळे ठाकरे भडकले