घरCORONA UPDATEशिवसैनिकालाही वाटते राज ठाकरे यांची भूमिका योग्यच!

शिवसैनिकालाही वाटते राज ठाकरे यांची भूमिका योग्यच!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सामना मधून टीका करण्यात आली आहे. मात्र खुद्द शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

राज्याला महसूल मिळवून देणारे वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे? असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लिहिले होते. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सामना मधून टीका करण्यात आली आहे. मात्र खुद्द शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राज्यातील वाईन शॉप सुरू करावे, अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

शिवसैनिकांने काय म्हटलंय पत्रात 

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना रास्त असून, त्यांनी वाईन शॉप बंद असल्यामुळे असलेल्या राज्याच्या महसूलाबाबत सुचवले आहे ते योग्यच आहे. त्यामुळे माझ्या निदर्शनात काही बाबी आल्या आहेत. वाईन शॉप बंद असल्याने बियर विदेशी दारू आणि वाईन याचा काळाबाजार होत आहे. दोनशे रुपये किमतीची बियर ६०० ते ७०० रुपये किमतीला विकली जात आहे. त्यासाठी घरातील व्यसनी पुरुष आणि तरुण वाटेल ती किंमत मोजून दारू विकत घेत आहेत. त्यामुळे घर चालवणाऱ्या महिलावर्गात पैशाची चणचण भासत आहे. मुलांना दूध देण्यासाठी तरी पैसे मिळतील का?असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तसेच ग्रामीण भागात घरोघरी दारू बनविण्याचे काम काही लोक करत आहेत. अशी गावठी दारू पिऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन वाईन शॉप सुरु करावे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

मद्यविक्री मागील लक्षार्थ महत्वाचा

दरम्यान याच पत्राचा आधार घेत मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मद्यविक्री मागील लक्षार्थ महत्वाचा आहे. बाळासाहेब असते तर त्यांनीही हीच परखड भूमिका मांडली असती जी राजसाहेबांनी मांडली आहे. राजसाहेबांच्या विचारांचं समर्थन करणारे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्रीना पाठवलेले पत्रांची कल्पना आपल्याला नसावी असे ट्विट यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.

काय केली सामनातून टीका

दरम्यान आजच्या सामनाच्या अग्रलेखात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज यांनी मोठेच उपकार केले आहेत. गेले ३५ दिवस महाराष्ट्रातील उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे बंद आहेत. ही पोळीभाजी केंद्रे, उपाहारगृहेसुद्धा सुरू व्हावीत. तसेच राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांचेही राज ठाकरेंना समर्थन

कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. आरोग्य सेवा आणि इतर गोष्टींवरील खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेली सूचना वास्तवतेला धरून आणि राजकारणापलीकडची आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, स्टॅम्प ड्यूटी असे उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत. केंद्राकडून जीएसटीचा परतावा येणे बंद झालेले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मागणीकडे मद्यविक्री म्हणून नाही तर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहिले पाहीजे. आज ना उद्या राज्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हणत भुजबळ यांनी देखील राज ठाकरेंचे समर्थन केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -