घर महाराष्ट्र ...तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही, ठाणे मृत्यू प्रकरणावरून शरद पवारांची टीका

…तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही, ठाणे मृत्यू प्रकरणावरून शरद पवारांची टीका

Subscribe

मुंबई : ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. हाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रशासनावर टीका केली आहे. तर, मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील आणि 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते. तर काही रुग्णांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर सिव्हिल रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद झाल्याने सर्व ताण हा ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येतो. पण रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – ठाण्याच्या रुग्णालयातील 17 रुग्णांच्या मृत्यूवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत, प्रशासनाच्या गलथानपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्रभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Thane : कळवा रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू; डीन राकेश बारोट यांनी दिलं स्पष्टीकरण

सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

- Advertisment -