मुंबई: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे. सरकारमधील मंत्री छगन भुजबळ तर वारंवार आपला विरोध जाहीररित्या मांडत आहेत. अशातच त्यांनी म्हटलं की मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागच्या दारानं आरक्षण देण्यासारखं आहे. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Even while studying Chhagan Bhujbal talks about Maratha reservation like this A critique of Bachu Kadu)
काय म्हणाले बच्चू कडू?
मराठा समाजाला कुणबी म्हणून 100 टक्के आरक्षण मिळेल, असं बच्चू कडू म्हणाले. दोन्ही पद्धतीने आरक्षण मिळायला सोपं जाईल. सर्वोच्च न्यायालयात सरकार ताकदीनं बाजू मांडेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, ते कुणबी आहेत हे 100 टक्के सत्य आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
“अभ्यास असून भुजबळ असं बोलतात नवलंच”
मराठवाड्यात कुणबींच्या 5 हजार नोंदी होत्या, त्या वाढल्या कशा? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. याबाबत कडूंना विचारलं असता ते म्हणाले की, नोंदी आहेतच. सरकार सगळ्या जुन्या नोंदी काढत आहेत. त्या नोंदी काही पाकिस्तान, अमेरिकेतून आणल्या आहेत का? भुजबळ हे अभ्यासू नेते आहेत. त्यांनी तपासलं पाहिजे. महात्मा फुलेंनीही सांगितलं की कुणबी, माळी, धनगर हे सख्खे भाऊ आहेत. त्यांना वेगळं करू नका. तसंच ते म्हणाले की महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीतील लोक सगळे मराठा आहेत. मराठा हा समूहवाचक शब्द आहे. तो एका जातीचा नाही. त्यामुळे भुजबळांनी अभ्यास असूनही असं बोलावं याचं नवलंच वाटतं मला, असं कडू म्हणाले.
(हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन; पेडणेकरांनी आरोप फेटाळले, ED चौकशीसाठी दाखल )