“मविआ सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता”, आदित्य ठाकरेंचा दावा

"राज्यपालांचे कार्यालय हे हुकूमशाही चालवण्यासाठी वापरले जात होते का? हे तपासणे गरजेचे आहे. राज्यांना काही अधिकार आहेत का? यांचे उत्तर मिळायला हवे," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई | “महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता, हे सर्वांना समजले”, असा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सत्तासंघर्षावर आज निकाल दिला आहे. यात राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyar) यांच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना शिंदे सरकार, भगतसिंग कोश्यारी आणि शिंदे गट आदी मुद्यांवर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल आपण पाहिला आहे. याआधीच सांगितले की, सरकार हे अनैतिक, बेकायदा आणि घटनाबाह्य आहे. आम्ही सतत सांगत होतो की, राराज्यपाला हे एका पक्षाची भूमिका चालवत होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता, हे सर्वांना समजले.”

“राज्यपालांचे कार्यालय हे हुकूमशाही चालवण्यासाठी वापरले जात होते का? हे तपासणे गरजेचे आहे. राज्यांना काही अधिकार आहेत का? यांचे उत्तर मिळायला हवे,” असे सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष भाजपचे आहेत, यामुळे तुम्हाला विश्वास आहे का की निर्णय तुमच्या बाजूने येईल? या प्रश्नावर आदित्य म्हणाले, “हे, भाजप सांगत होते की, पक्ष फोडण्यात आमचा काही हात नव्हता. आजच्या प्रमाणे दुसरे मुख्यमंत्री ( उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) बाजूला बसून बोलत होते की, यामुळे आपल्याला कळाले की यात कोणाचा हात होता.”