अनिल परब प्रकरणाच्या चौकशीत चार भिंतीच्या आड काय झाले?

आरटीओ भ्रष्टाचार प्रकरण

राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या परिवहन विभागातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांना तिसर्‍या दिवशी बुधवारी (दि.२) पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. तपासी अधिकारी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून, काही पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत. विशेष म्हणजे, दिवसभरात बारकुंड यांनी मंत्रालयातील उपसचिव प्रकाश साबळे व अवर सचिव डी. एच. कदम यांचा पूर्ण जबाब नोंदवून घेतला. यावेळी प्रतिनियुक्ती, आदेश व बदलीसंदर्भातील कागदपत्रे दोन्ही अधिकार्‍यांनी पोलिसांकडे सादर केले.

बुधवारी तक्रारदार गजेंद्र पाटील याने चौकशी दरम्यान तिसर्‍या दिवशी आणखी साक्षी पुरावे दाखल केले. तसेच उपसचिव प्रकाश साबळे, अवर सचिव डी.एच कदम यांची चौकशीचा बुधवारी दुसरा दिवस होता. दिवसभर चाललेल्या चौकशीअंती बदल्या, प्रतिनियुक्ती, पदोन्नती या मुद्द्यांवर दोन्ही अधिकार्‍यांची चौकशी पूर्ण झाली. यावेळी अधिकार्‍यांनी विविध आदेशांचे कागदपत्रे दाखल केली. बुधवारी श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षक ढहाके यांनाही चौकशीला बोलविण्यात आले होते.

गुरुपासून नवीन अधिकार्‍यांची चौकशी

आरटीओ भ्रष्टाचारप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. चौकशीसाठी ६० व्यक्तींना बोलविले जाणार आहे. यामध्ये अधिकारी व खासगी व्यक्तींचा समावेश आहे. गुरुवारी (दि.३) पुन्हा तक्रारदारासह सात नवीन अधिकार्‍यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. तसेच, शुक्रवारी (दि.४) सात अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.