मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झंझावातासमोर महाविकास आघाडीला तग धरता आला नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर यश आले. त्यांनतर आता सर्व विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडले आहे. काँग्रेसचे नेते आणि पराभूत उमेदवार नसीम खान यांनी ईव्हीएममध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (EVM issues in Maharashtra Election Result 2024 MVA complaint against EVM)
हेही वाचा : Sharad Pawar : “मला निकाल मान्य नाही”, पवारांच्या उमेदवारानं नाकारला निकाल; एका-एका मताचं ‘गणित’ मांडलं
माध्यमांशी संवाद साधताना नसीम खान म्हणाले की, “अनेक गावांमध्ये ईव्हीएम संदर्भात तक्रार आमच्याकडे आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान दिले, पण तरीही मोजणीदरम्यान तसे मतदान दिसून आलेले नाही. अशा अनेक तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत. कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅट यांची आकडेवारी जुळवण्याचा प्रत्येक उमेदवाराला 5 टक्के अधिकार आहे. त्या कायद्याप्रमाणे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्यासह देशात लोकशाही आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत. ज्याप्रकारे महायुतीला राज्यात यश मिळाले, त्याबद्दल महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. 29 नोव्हेंबर आधी आम्ही सर्व उमेदवार त्या त्या जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करणार आहोत.” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेससोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानेदेखील याविरोधात कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी (26 नोव्हेंबर) मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील पराभूत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी विधानसभेच्या निकालावर तसेच ईव्हीएमच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ठोस भूमिका घेण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे निवडून आले होते. पण त्यानंतरही त्यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. आता एकीकडे महायुती मुख्यमंत्रीपदावर कोणाला बसवणार? याची चर्चा असताना महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात काय ऍक्शन घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.