अहमदनगर : नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा झालेल्या या निवडणुकीत अनेक शासकीय वाहनांचा उपयोग करण्यात आला. यावेळी राज्यातील अनेक एसटी बसेस या सेवेसाठी वापरण्यात आल्या होत्या. अनेक ईव्हीएमची वाहतूक करण्यासाठी या एसटी बसेसचा वापर करण्यात आला. पण दोन दिवसांनंतर अशाच एका एसटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी एका प्रवाशाला त्या एसटीमध्ये एक नोटांचे बंडल सापडल्याने धक्काच बसला. (EVM transport by ST Bus after two days found notes bundles underneath seats)
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : भाजपाची रणनिती, अपक्ष-बंडखोरांना गळाला लावण्यासाठी सहा नेते मैदानात
नेमकं घडलं काय?
अहमदनगर जिल्ह्यात एका एसटी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आला. 500 रुपयांच्या नोटांचे 2 बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्ह्यातील कोपरगाव येथे ही घटना घडली असून एसटी आगार आणि पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने प्रामाणिकपणे बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने चर्चांना उधाण आले. तसेच, ही रक्कम कोणाची? कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून घेऊन जाण्यात येत होती? याचाही तपास करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मतदानच्या एक दिवसआधी (19 नोव्हेंबर) हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर 21 नोव्हेंबरला याच बसने कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. 21 नोव्हेंबरला संध्याकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे 2 बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केल्यानंतर तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. ही मोठी रक्कम नेमकी कोणाची? तसेच बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात सर्वगोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.