मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी (20 नोव्हेंबर) पार पडले. त्यानंतर अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. काहींनी महायुतीला सर्वाधिक जाग मिळणार असल्याचे सांगितले तर काहींनी महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे भाकीत रचले. गुरुवारी (21 नोव्हेंबर) प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी लहान पक्ष आणि अपक्षांचे सरकार बनेल आणि आम्ही दुसर्यांचा पाठिंबा घेत अपक्षांचा मुख्यमंत्री बसवू, असा मोठा दावा केला होता. दरम्यान, गुरुवारीच एका पोलमध्ये अपक्षांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनणार असल्याचे समोर आले. यामध्ये राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असून मुख्यमंत्री ठरवण्यात अपक्षांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पोलची चांगलीच चर्चा होत आहे. (Exit Poll by Mumbai marathi journalists association independents support will decide cm)
हेही वाचा : Maharashtra Assembly Election : रायगडच्या मतदारांना जेव्हा जाग येते, जिल्ह्यातील मतदानात 3.29 टक्के वाढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात अंदाज वर्तविण्याची स्पर्धा घेतली होती. यामध्ये मुंबईतील अनेक पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत आपले अंदाज वर्तवले होते. या स्पर्धेमधील सरासरी अंदाजानुसार महायुतीला 140 तर महाविकास आघाडीला 138 जागांवर विजय मिळू शकतो. या अंदाजानुसार या निकालामध्ये इतर आणि अपक्षांना 10 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन अपक्षांची भूमिका किंगमेकरची ठरेल, असे एकंदर चित्र समोर आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुंकासाठीच्या निकालाची चुरस आणखी वाढली आहे. दरम्यान, अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक पसंती देण्यात आल्याचे समोर आले आहे. यावेळी 10 पैकी 7 संस्थांनी महायुती बहुमताचा आकडा गाठेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, 3 सर्वेक्षण संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असे भाकीत वर्तवले आहे.
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मोठा दावा गुरुवारी केला होता. ते म्हणाले होते की, “लहान पक्ष आणि अपक्षांचे सरकार बनणार आहे. आम्ही दुसऱ्यांचा पाठिंबा घेऊ. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केला. ते पुढे म्हणाले की, “माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपने खालची पातळी गाठत प्रचार केला. काँग्रेस आणि भाजप दोघेही अचलपूर मतदारसंघात संभ्रमात होते. काँग्रेसवाल्यांनी काही ठिकाणी भाजपला आणि भाजपने काही ठिकाणी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितले. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, “प्रहारचे किमान 10 आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून 15 आमदार होतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.