राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते असल्याने अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवला

Amit shaha

अजित पवार हे स्वत: आमच्याकडे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने, मुख्यमंत्रीपदाचे आमिष दाखवून शिवसेनेचा तबेलाच, ५४ आमदारांचा नेला, अशी टीकाही त्यांनी केली.

एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जनादेशाचा अनादर करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केले आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली नाहीत. आदित्य ठाकरेंनी तेच केले आहे.

आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करतात. आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवले नाही, आमदारांना हॉटेलवर ठेवून एकमेकांशी हातमिळवणी करून सरकार बनविणे म्हणजे भाजपचा पराभव नाही. कोणत्या विचारधारेच्या बळावर हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला; पण मुख्यमंत्रिपद देऊन आघाडीने सरकार बनविले, पद देऊन सरकार बनविणे हा घोडेबाजार नाही का? असा सवाल अमित शहांनी केला.

जशी आमची युती होती, तशीच त्यांचीही आघाडी होती. आमच्यावर आरोप केले जातात की, आम्ही घोडेबाजार करतोय. एक-दोन घोडे सोडा, तुम्ही शिवसेनेच्या घोड्यांचा पूर्ण तबेलाच चोरी केला आहे. मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरलाय. मुख्यमंत्रीपदाचे आमिष दाखवून केलेला हा घोडेबाजार देशातील सर्वात मोठा घोडेबाजार आहे. मी शरद पवार आणि सोनिया गांधी यांना आव्हान देतो की, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करा आणि शिवसेनेचे समर्थन मिळवून दाखवा. बघा ते समर्थन देतात का? या दोन्ही पक्षांचे मिळून 100 च्या जवळपास जागा होताएत. तुमची आघाडी आहे, मग मुख्यमंत्री तुमचा बनवा, शिवसेनेचा कशाला, असेही अमित शहा म्हणाले.