खोपोली: रासायनिक लघु उद्योगात भीषण स्फोट; एक ठार, चार जखमी

Explosion in chemical small scale industry in khopoli One killed, four injured
खोपोली: रासायनिक लघु उद्योगात भीषण स्फोट; एक ठार, चार जखमी

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील साजगाव परिसरातील एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारील सहा लघु उद्योग आगीत भस्मसात झाल्याचे समोर येत आहे. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. काल मध्यरात्री २.५०च्या सुमारास जोरदार स्फोट झाला असून या स्फोटाच्या दणक्याने ३-४ किमी परिसरात आवाज आला. तसेच १ किमी परिसरातील घरांचे आणि काही कंपन्यांच्या खिडक्या दरवाज्याच्या काचा तुटल्या. पत्रे शेड तुटले. या स्फोटाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील अनेक लघुउद्योगातील कामगारांना सुरक्षीत ठिकाणी हलविले.

खोपोली नगरपरिषद, HPCL, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद, पेण नगरपरिषदेसह एकूण १० फायर ब्रिगेड टिमने ४ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या स्फोटामुळे शेजारील पेट्रोसोल कंपनीतील सिक्युरीटी गार्डच्या पत्नीचा स्फोटाच्या दणक्याने शेड पडून जागीच ठार झाली. तर सिक्युरीटी गार्डसह ३-४ जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल केले आहे. खालापूर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सहा पो नी असवरे, PSI वळसगं, PSI किसवे सह खालापूर व खोपोली पोलीस स्टेशन मधील अनेक कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली.