पुणे : कांद्यानंतर आता साखरेवरील निर्यात शुल्क वाढेल, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे पुण्याच्या पुरंदरमधील सभेतून कांदा प्रश्न, साखर निर्यात दुष्काळ केंद्र आणि राज्य सरकारांवर हल्लाबोल केला आहे.
कांदा प्रश्नवर शरद पवार म्हणाले,”कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्या मिळत नाही. कांद्यासाठी सरकारने जाहीर केलेला दर हा कांदा उत्पादकासाठी पुरेसा नाही. योग्य किंमत मागणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण आता केंद्र सरकार त्यावर सुद्धा बंधन आणण्याच्या विचार करत आहे. येत्या तीन ते चार दिवसामध्ये साखर निर्यातीवरही काही वेगळी भूमिका ही केंद्र सरकार घेण्याची शक्यता. जर तसे झाले, तर ऊसाला चांगली किंमत देण्याची ताकत कोणत्याही कारखान्याची राहणार नाही”, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – कांदा पेटलेलाच ! लिलाव पाडले बंद, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग केला ३ तास ठप्प
कष्टकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध पावले
शरद पवार पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची स्थिती निर्माण झाली. तर त्यावर बंधन घालणे आणि अवर घालणे हे धोरण आजच्या राज्यकर्त्यांचे आहे. हे धोरण तुमच्या आणि माझ्यासाठी हिताचे नाही. म्हणून मला स्वत:ला असे वाटते की, एकसंघ राहून जिथे कष्टकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध पावले टाकली जातात. त्या सगळ्या ठिकाणी आपण नवीन निती आणि अनुकूल धोरणे या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.”