घरमहाराष्ट्र२६ मंत्री, १० राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ विस्तार

२६ मंत्री, १० राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ विस्तार

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी सकाळी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानभवन प्रांगणात आयोजित एका साध्या समारंभात मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीमध्ये शिवसेनेच्या आठ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री तर काँग्रेस पक्षाच्या आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री कोण या चर्चेचाही या शपथविधी सोहळ्यात गुंता सुटला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळाचा कोरम पूर्ण झाला आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या वतीने दिग्रजचे (यवतमाळ) संजय राठोड, खानदेशमधील जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, मालेगावचे (नाशिक) दादा भुसे, पैठण (औरंगाबाद)चे संदिपान भुमरे, मुंबईचे विधान परिषद सदस्य अनिल परब, रत्नागिरीचे उदय सामंत, वरळीचे आमदार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, नेवासा येथील अपक्ष क्रांतिकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. यातील गडाख यांनी सुरुवातीलाच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पाटणचे शंभूराजे देसाई, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू(अचलपूर) आणि शिरोळ कोल्हापूरचे राजेंद्र यड्रावकर यांना राज्यपालांनी राज्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि नांदेड भोकरचे आमदार अशोक चव्हाण, नंदुरबार (अक्कलकुवा)चे के. सी. पाडवी, ब्रह्मपुरी (चंद्रपूर)चे विजय वडेट्टीवार, लातूर शहरचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख, सावनेर (नागपूर) चे सुनील केदार, तिवसा (अमरावती)च्या यशोमती ठाकूर, धारावी (मुंबई)च्या वर्षा गायकवाड आणि मालाड पश्चिम (मुंबई)चे अस्लम शेख यांना राज्यपालांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली. तर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि पलूस कडेगावचे डॉक्टर विश्वजित कदम यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून शपथ दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांच्याशिवाय माजी मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, परळी(बीड)चे धनंजय मुंडे, कटोल (नागपूर)चे अनिल देशमुख, कागलचे हसन मुश्रीफ, सिंदखेड राजा(बुलढाणा)चे राजेंद्र शिंगणे, अणुशक्तीनगर (मुंबईचे) नवाब मलिक, उदगीर (लातूर)चे राजेश टोपे, मुंब्रा(ठाणे)तील जितेंद्र आव्हाड आणि कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची तर इंदापूर मतदारसंघात भाजपत प्रवेश घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेले दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आणि श्रीवर्धन (रायगड)च्या आमदार अदिती तटकरे, उदगीर (लातूर)चे संजय बनसोड आणि राहुरी (अहमदनगर)च्या प्राजक्त तनपुरे यांना राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सुभाष देसाई आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना सेनेच्यावतीने तर छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात यांना राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

विस्तारात शरद पवारांचेच वर्चस्व

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. अगदी शिवसेनेच्या कोट्यातूनही दोन मंत्रीपदे पवारांनी घेतली आहेत. शंकरराव गडाख आणि राजेंद्र यड्रावकर हे पवारांचे समर्थक मानले जातात. इतकेच नव्हेतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानंतर पवारांनी पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवायचे ठरवल्याचे दिसत आहे. गटनेतेपदी जयंत पाटील, गृहमंत्रीपद पवारांचे एकनिष्ठ असलेल्या दिलीप वळसे पाटील किंवा अनिल देशमुख यांना स्थान मिळू शकते. मात्र मंत्रिपदाच्या वाटपात कट्टर अजित पवार समर्थकांना फार स्थान नाही. नगरमध्ये संग्राम जगताप यांना डावलून प्राजक्त तनपुरे यांना स्थान दिले हे त्याचे उदाहरण असू शकते.

अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी अजित पवार नोव्हेंबर २०१० रोजी, ऑक्टोबर २०१२, नोव्हेंबर २०१९ रोजी आणि सोमवारी ३० डिसेंबर रोजी शपथ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यापैकी २०१० आणि २०१२ रोजी आघाडी सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री होती. तर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ८० तासांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. आता चौथ्यांदा अजितदादांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले.

राज्यात ४३ मंत्री

सोमवारी पार पडलेल्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या २३ झाली असून, १० राज्यमंत्री असतील. यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 43 मंत्री झाली आहे. राज्य सरकारमधील खात्यांची संख्या लक्षात घेता मंत्र्यांची संख्या पुरेशी असल्याचा दावा केला जातो.

भाजप आमदारांचा बहिष्कार

आजच्या शपथविधीच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. हा बहिष्कार अघोषित असला तरी राज्यातल्या शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीवर नाराजी म्हणून हा बहिष्कार घालण्यात आल्याचं सांगण्यात आले. ही कर्जमाफी म्हणजे केवळ फसवणूक असल्याचा आरोप करत हा बहिष्कार घालण्यात आला असल्याचे सांगण्यात येत असले तरी चंद्रपूरचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी मात्र सोहळ्याला उपस्थिती लावली.

घोषणांचा गजर

राज्यपाल कोश्यारी यांचे विधानभवन परिसरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यावर अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. एकच वादा अजित दादा.. अशा जोरदार घोषणा देत अजित पवारांचे स्वागत केलेक. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, गुलाबराव पाटील, डॉ. विश्वजित कदम, धनंजय मुंडे यांच्या नावाची शपथ घेण्यासाठी घोषणा होताच जोरदार घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यांनी शपथ घेताना घोषणांचा गजर झाला. अनेकदा राज्यपालांनाच घोषणा थांबवण्याचा इशारा द्यावा लागला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर २४ मंत्र्यांनी ईश्वर साक्ष आणि एका बच्चू कडू यांनी तिरंग्याला साक्ष ठेवून शपथ घेतली. तर अब्दुल सत्तार(शिवसेना), हसन मुश्रिफ, नवाब मलिक(राष्ट्रवादी), अस्लम शेख(काँग्रेस) यांनी अल्लांच्या नावाने शपथ घेतली.

या जिल्ह्यांना मंत्रीपदासाठी स्थान नाही
१) गडचिरोली
२) गोंदिया
३) वर्धा
४) वाशीम
५) अकोला
६) परभणी
७) हिंगोली
८) उस्मानाबाद
९) सोलापूर
१०) सिंधुदुर्ग
११) पालघर

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -