घरनवी मुंबईशनिवार अग्नितांडववार!

शनिवार अग्नितांडववार!

Subscribe

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर खासगी बस-ट्रकच्या भीषण अपघातात १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ५३ जखमी

नाशिक, मुंबई, ठाणे आणि पनवले या शहरांमध्ये विविध ठिकाणी एकाच दिवशी आगी लागण्याच्या घटना घडल्याने शनिवार हा अग्नितांडववार ठरला. नाशिक-औरंगाबाद मार्गावर शनिवारी पहाटे खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन घडलेल्या अग्नितांडवामध्ये १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, तर ५३ प्रवासी जखमी झाले. सप्तश्रृंगी गडाजवळ एसटी बसमध्येही आग लागल्याची घटना घडली. तसेच मनमाड येथे गॅस सिलिंडर वाहून नेणार्‍या ट्रकनेही पेट घेतल्याने शनिवारी नाशकात विविध ठिकाणी अग्नितांडवाचे सत्र सुरू असल्याचे चित्र होते. मुंबईतील कुर्ला येथेही एका निवासी संकुलात शनिवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने या ठिकाणी जीवितहानी टाळता आली, तर ठाण्यातही एक सर्व्हिस सेंटर आगीच्या विळख्यात सापडले. तसेच पनवेलमधील कळंबोली येथेही एका खाजगी क्लासेसला आग लागल्याची घटना घडली.

औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १४ प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.

- Advertisement -

यवतमाळ येथून ही बस शुक्रवारी रात्री नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यात ५३ पेक्षा अधिक प्रवासी होते. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकी फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवासी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

बसमधील जे प्रवासी जागे होते त्यांनी तातडीने बसबाहेर धाव घेत मदतीसाठी आकांत सुरू केला, तर काहींनी थेट बसच्या खिडक्यांमधून उड्या घेत जीव वाचवला. घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर अग्निशमन दलाचे केंद्र असतानाही प्रत्यक्षात मदत पोहचण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, त्यानंतर अग्निशमन आणि नंतर अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणार्‍या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले होते, मात्र आग एवढी भीषण होती की मदतीसाठी याचना करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. काही जखमींना अक्षरशः रस्त्यावर झोपवण्यात आले होते. अ‍ॅम्ब्युलन्सची वाट पाहत ते विव्हळत पडले होते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने मदत करीत होता. सिटी लिंक बसच्या माध्यमातून जखमी व मृतांना हलविण्यात आले.

- Advertisement -

ओळख पटलेल्या मृतांची नावे
अजय कुचनकार (१६, यवतमाळ), उद्धव भिलंग (४४, वाशिम), लक्ष्मीबाई मुधोळकर (५०, बुलढाणा), कल्याणी मुधोळकर (३, बुलढाणा), शंकर कुचनकार (१८, यवतमाळ), साहिल चंद्रशंकर (१५, वाशिम), पार्वती मुधोळकर (४५, बुलढाणा)

सप्तश्रृंगी गडावर बर्निंग कार, प्रवासी सुखरूप

 शहरातील औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास सप्तश्रृंगी गडावरील टोल नाक्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पेट घेतल्याने काळजाचा ठोका चुकला. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले आहेत, मात्र यात बस जळून खाक झाली आहे.

सप्तश्रृंगी गडावरील ग्रामपंचायत टोल नाक्याजवळ ही घटना घडली. पिंपळगाव बसवंत डेपोची बस (एमएच १४ बीटी ३७५२) प्रवाशांना घेऊन सप्तश्रृंगी गडाकडे निघाली होती. गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत यात्रा होत असते. दरम्यान, गडावर जात असताना अचानक बसला आग लागली. प्रसंगावधान राखत चालक एस. बी गरूड आणि वाहक सुरेखा आर. खलाटे यांनी प्रवाशांना घटनेबाबत माहिती देत त्यांना उतरण्यास सांगितले. वेळीच आग लागल्याची माहिती प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांनी बसबाहेर उड्या घेतल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, रोप वे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेत फायर एक्स्टिंविशरद्वारे आग आटोक्यात आणली. तातडीने बचावकार्य करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणालाही इजा झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कळवण उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी केले आहे.

मनमाडनजीक सिलिंडरच्या गाडीचा स्फोट

 गॅस सिलिंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास मनमाडनजीक घडली. पुणे-इंदूर महामार्गावर झालेल्या या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते.

आग लागल्यानंतर सिलिंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किमी लांब रोखून धरण्यात आली. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलिंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले, मात्र सिलिंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत होती. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्युत तारेचा शॉक लागून ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू

तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे नागरिकांनी महावितरण कंपनीविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे. अनिकेत अरुण बर्डे (१२), ओंकार अरुण बर्डे (१०), दर्शन अजित बर्डे (८), विराज अजित बर्डे (६) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारच्या सुमारास चारही मुले वांदरकडा येथील नाल्यात आंघोळीसाठी गेली होती. त्याचदरम्यान वीजवाहक तारांचा शॉक लागून सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व चारही मृतदेहांना बाहेर काढत झोळीतून अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत नेले.

 कळंबोलीत खासगी शिकवणी वर्गाला आग

कळंबोली वसाहतीमधील एका खासगी शिकवणी वर्गाला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या घटनेवेळी शिकवणीसाठी आलेली मुले वर्गात उपस्थित होती. आग लागताच मुलांनी दप्तर वर्गातच टाकून धूम ठोकल्याने पुढील दुर्घटना टळली.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ३ ई येथील एफ ९ या इमारतीच्या दुसर्‍या माळ्यावर व्यास अ‍ॅकॅडमी नावाने शिकवणी वर्ग घेतले जातात. रहिवासी इमारतीत सुरू असलेल्या या वर्गाच्या खोलीत लावण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्राच्या कॅाम्प्रेसरला ही आग लागल्याची माहिती घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन अधिकार्‍यांनी दिली. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नियमानुसार वातानुकूलित यंत्राचे कॉम्प्रेसर वर्गाबाहेर असणे आवश्यक आहे. शिकवणी चालकांनी मात्र हे कॉम्प्रेसर वर्गाच्या आतल्या बाजूस ठेवल्याने गर्मीमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसून दुर्घटनेप्रसंगी सुरक्षितस्थळी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन मार्ग उपलब्ध नसल्याने शिकवणी चालकांना नोटीस बजावणार असल्याची माहितीदेखील अग्निशमन अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या कळंबोली अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

नवीन टिळक नगरमध्ये रहिवासी इमारतीला आग

चेंबूर, नवीन टिळक नगर, रेल्वे टर्मिनल्स येथे एका तळमजला अधिक १२ मजली रहिवासी इमारतीमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. काही महिला व पुरुष रहिवासी आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीमधील घराच्या खिडकीबाहेर उतरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या ३३ रहिवाशांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्राप्त माहितीनुसार चेंबूर, नवीन टिळक नगर, रेल्वे टर्मिनल्स येथे शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रेल व्ह्यूव एमआयजी सोसायटी या तळमजला अधिक १२ मजली रहिवासी इमारतीच्या १२व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला ही आग लहान स्वरूपात डक्टमधील इलेक्ट्रिक वायर, भंगार सामान आणि कचर्‍याला लागली होती, मात्र अवघ्या अर्ध्या तासात आग थोडी भडकून काळाकुट्ट धूर पसरला होता. आगीच्या वृत्ताने इमारत परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच रहिवासी इमारतीमध्ये अडकले व काहीसे भयभीत झाले होते.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही अवधीतच अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण यंत्रणेसह घटनास्थळी पोहचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. इमारतीच्या पॅरापेटमधील भागात ४ व्यक्ती अडकल्या होत्या, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील एकूण ३३ रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेण्यात नेले. त्यामुळे ते बचावले, अन्यथा अनर्थ ओढवला असता.

अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन व २ जम्बो वॉटर टँकरच्या साहाय्याने तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत तरी आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र काही रहिवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना नाकातोंडात धूर गेल्याने थोडासा त्रास झाल्याचे समजते.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची घटनास्थळाला भेट
दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन राहिवाशांशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांशी संवाद साधला. रहिवाशांना काहीसा धीर देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. आगीसारखी दुर्घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपत्कालीन परिस्थितीला तोंड देऊन शक्यतो आपला व इतरांचा जीव वाचविण्यासाठी मदत करावी, असे माजी महापौर पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत ः शिंदे
बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रुग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेनंतर देशभरातून दुःख व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेप्रकरणी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. नाशिक अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. ‘अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना, जखमी लवकरात लवकर बरे होवोत,’ असे या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या वारसांना २ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -