बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

संग्रहित छायाचित्र

 

पुणेः ठाकरे गटाची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही. तरीही उद्धव ठाकरे म्हणतात न्यायालयाचा निकाल सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ते पुणे येथे होते. तेथील कार्यक्रमात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आमचं सरकार संविधानिक आहे. कायद्याच्या चौकटीतच स्थापन झाले आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. परत निवडूनही येणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. शिल्लक सेना महाविकास आघाडीसोबत आहे. शरद पवार यांचं एक पुस्तक आलं आहे. त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत स्पष्ट लिहिले आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेत संघर्ष होईल याची कल्पना नव्हती. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नव्हते. ते सर्व माहिती ठेवत नव्हते. संघर्ष न करता त्यांनी पद सोडलं. ही परिस्थितीती टाळता आली असती, हे सर्व शरद पवार यांनी सांगितलं आहे. आम्हीही तेच म्हणत होतो. तेव्हा आमच्यावर महाराष्ट्र द्वेषी असा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीचे जनक शऱद पवार यांनीच उद्धव ठाकरेंवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. यासाठी शरद पवार यांचे मी आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

नाना पटोले यांचेही कौतुकच करायला हवे. ते म्हणतात अंबानी यांच्या घराबाहेर मीच स्फोटके ठेवली. त्यांचं हे वाक्य ऐकून मला मजा आली. मी तर म्हणेन २६/११ चा हल्लाही नाना पटोले यांनी केला. सचिन वाझेचा विषय पुन्हा पुन्हा काढून नाना पटोले आमची मदतच करत आहेत. मुळात सचिन वाझेला परत घेण्यास माझा विरोधच होता. तसा शेराही मी फाईलवर लिहिला होता. महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर लगेचच वाझेला सेवेत घेण्यात आलं. वाझे सेवेत आल्यानंतर मातोश्री आणि वर्षावर असायचा. मी मनसुख हिरेनची हत्या शोधून काढली नसती तर यांनी हजारो कोटी रुपये उकळले असते. परमबीर सिंग यांना आयुक्त ठाकरेंनीच केलं. नंतर त्यांना काढूनही त्यांनीच टाकलं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.