घरमहाराष्ट्रफडणवीसांना हवंय गृहमंत्रिपदही

फडणवीसांना हवंय गृहमंत्रिपदही

Subscribe

म्हणूनच शिवसेनेने केली कोंडी! ,व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ठरतेय अडचण

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्पर्धा सुरु होऊन १३ दिवस झाले असताना शिवसेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असण्याचे प्रमुख कारण म्हणजे फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद तर हवेच, पण त्यांना त्यासोबत गृहमंत्रिपदही सोडायचे नाही, अशी माहिती भाजपच्या एका बड्या नेत्याने ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली. मुख्यमंत्र्यानी थोडे नमते घेतले असते तर दिवाळीनंतर लगेचच भाजपचे सरकार आले असते. पण, फडणवीस यांच्या हट्टापायी सत्तेचे घोडे अडले, याकडे या नेत्याने लक्ष वेधले.

१९९५ मध्ये शिवसेना आणि भाजपचे युती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री सेनेचे मनोहर जोशी झाले आणि गृहमंत्रिपद भाजपच्या गोपीनाथ मुंडेंकडे गेले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा असताना सलग १५ वर्षे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. २०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्यानंतर फडणवीस यांनी गृहमंत्री आपल्याकडे ठेवले. पण, २०१९ मध्ये भाजपच्या १०५ जागा झाल्याने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे आणि गृहमंत्रीपद हवे.

- Advertisement -

मात्र फडणवीस ते सोडायला तयार नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. गृहखाते हे राज्य सुरळीत चालवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाचे खाते आहे. संपूर्ण पोलीस दल आपल्या हातात तर राहतेच, पण विरोधकांवर बारीक लक्ष ठेवण्याबरोबर मित्रपक्षांच्या हालचालीबाबत दररोज इत्यंभूत माहिती मिळते. मुख्य म्हणजे तपास यंत्रणांचा खुबीने वापर करून महत्वाकांक्षी नेत्यांच्या नाड्या आपल्या हाती ठेवता येतात. फडणवीस यांनी गेली पाच वर्षे गृहमंत्रिपद आपल्या हाती ठेवताना या पदाचा मोठया खुबीने वापर करत मित्रपक्षाच्या नेत्यांनाच नव्हे तर स्वपक्षातील नेत्यांनाही काबूत ठेवले.

तसेच पक्षातील नेत्यांच्याही फाईल अपडेट केल्या होत्या, असे भाजपच्या या बड्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले. विशेष म्हणजे ज्या वेळी त्यांना अडचण वाटली तेव्हा त्या उघडून त्यांनी आपल्या कारभाराला कुठे अडचण येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. परिणामी विरोधक तसेच मित्रपक्ष एका मर्यादेपेशा फडणवीस यांच्यासमोर फार मोठी अडचण उभी करू शकले नाहीत. विशेष म्हणजे पक्षांतर्गत विरोधही त्यांनी मोडून काढला. पाच वर्षांत किंवा पुढे पहिल्या पाच महत्वाच्या नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे धुमारे फुटणार नाहीत, याची त्यांनी विशेष काळजी घेतली, अशी पुस्तीही भाजपच्या नेत्याने जोडली.

- Advertisement -

खरेतर आधीच्या म्हणजे १९९५ सालच्या युतीच्या आणि नंतर आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपदाऐवजी नगरविकास या पदात जास्त रस राहिला आहे. मात्र, फडणवीस यांना ही दोन्ही पदे भाजपची ताकद कमी झाल्यानंतरही आपल्या हातात का हवी आहेत, याविषयी या नेत्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या केंद्रीय नेतृत्त्व फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून त्याचाच भाग म्हणून सत्ता स्थापनेमध्ये केंद्राने हस्तक्षेप केलेला नाही.

टोकाचा विरोध होईल, पण शिवसेना सत्तेत येईल
देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे नाराज असलेली शिवसेना शेवटपर्यंत टोकाचा विरोध करणार, पण शेवटी भाजप महायुतीसोबत ते सत्तेत येणार आहेत. सरकार महायुतीचे यावे अशी जनतेची इच्छा असल्याने आम्ही सरकारमध्ये सहभागी होत आहोत, असे जाहीरपणे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करतील.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -