Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नामांतराच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी घेतली विरोधकांची शाळा

नामांतराच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी घेतली विरोधकांची शाळा

Subscribe

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यासाठी केंद्राने मंजुरी दिल्यानंतर जल्लोष करण्यात येत आहे. पण याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर या दोन्ही शहरात एकच जल्लोष करण्यात आला. पण यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री दानवेंच्या या प्रश्नाचे निरसन केले आहे, तर यावरून ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शाळा देखील घेतली आहे.

काय म्हणाले होते अंबादास दानवे?
नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्या निर्णयाचा फोटो त्यांच्या ट्विटरला शेअर केला होता. तर त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत म्हंटले होते की, “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावं.”

- Advertisement -

तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत दानवेंच्या ट्विटला रिट्विट करत उत्तर दिले की, “अंबादास दानवेंनी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.”

- Advertisement -

फडणवीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुढे आणखी एक ट्विट करत लिहिले आहे की, “त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!” असा टोला देखील फडणवीसांनी दानवेंना लगावला आहे.

श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी ह्या दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, त्यामुळे आम्ही उचललेल्या पावलांमुळे हे शक्य झाले असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे, तर भाजप-शिंदे यांची सत्ता आल्यानंतर नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादला धाराशिव म्हणा!

- Advertisment -