बुलढाणा : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात 28 जानेवारी रोजी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. यातील मृतांचा आकडा सुरुवातीला 10 सांगण्यात आला होती. मात्र त्यानंतर प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन 30 भाविकांचा मृत्यू आणि 60 भाविक जखमी झाल्याची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे यातील काही मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. अशातच बुलढाणा येथील कुंभमेळ्यात गेलेली महिला बेपत्ता झाल्याची बातमी समोर येत आहे. महिलेसोबत संपर्क होत नसल्याचे त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. कुटुंबाने महिलेशी संपर्क होत नसल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यानंतर आता जिल्हा प्रशासन प्रयागराज येथील यंत्रणेच्या संपर्कात आहेत. (Family in distress after woman from Buldhana goes missing during Kumbh Mela)
मिळालेल्या माहितीनुसार, बुवढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील रहिवासी असलेल्या उषाबाई लक्ष्मण बोरले या ज्येष्ठ महिला कुंभ मेळ्यात बेपत्ता झाल्या आहेत. उषाबाई बोरले या मौनी अमावस्येदरम्यान, बेपत्ता झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्या यमुनाबाई भालेराव यांच्यासह कुंभमेळ्यात गेल्या आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून उषाबाई बोरले आणि यमुनाबाई भालेराव यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने बोरले कुटुंबीय हवालदिल झाले आहे.
हेही वाचा – Mahakumbh Mela 2025 : चेंगराचेंगरीतील नक्की मृत किती? अद्याप 24 जणांची ओळख पटली नाही
उषाबाई बोरले यांचा मुलगा संतोष बोरले याने आपला भाऊ आकाशसोबत मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांची गुरुवारी (30 जानेवारी) रात्री उशिरा भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची आई बेपत्ता असल्याची तक्रार राहुल तायडे यांच्याकडे केली. यानंतर जिल्हाधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी बेपत्ता उषाबाई बोरले यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या ते प्रयागराज कुंभमेळ्यातील यंत्रणेच्या संपर्कात आहेत.
भंडाऱ्यातील विष्णूपदा मंडलही बेपत्ता
दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक कुंभमेळ्याला जमले होते. मंगळवारी मध्यरात्री संगम घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांची आपल्या आप्तांशी ताटातूट झाली. त्यातील काहींचा अद्याप ठावठिकाणा सापडलेला नाही. लोकांचे मोबाइल फोन हरवले, काहींचे बंद झाले, यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे. भंडारा जिल्ह्यातील 70 वर्षीय विष्णूपदा मंडलही बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मुलगा कपिल मंडल आणि शाली मंडल यांच्याकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. कपिल मंडल आणि शीला मंडल हे दोघे गुरुवारी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये विष्णूपदा मंडल यांचा शोध घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मंगळवार रात्रीपासून विष्णूपदा मंडल यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना धक्का! तब्बल ‘एवढे’ हजार अर्ज बाद