Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक अनिता पगारे यांचे निधन; ‘वस्तीवरची पोरं’ पोरकी

अनिता पगारे यांचे निधन; ‘वस्तीवरची पोरं’ पोरकी

कोरोनाची बाधा झाल्याने दाखल होत्या रुग्णालयात; सामाजिक क्षेत्राची मोठी हानी

Related Story

- Advertisement -

नाशिक- कष्टकरी, शोषितांचा आवाज, स्त्री मुक्ती चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या, शेतकरी आंदोलनांत सक्रिय असणार्‍या आणि आपल्या लेखणीतून सामाजिक भान जोपासणार्‍या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. २८) निधन झाले. अरुण ठाकूर, सुनील पोटे यांच्या निधनानंतर अनिता पगारे यांच्या जाण्याने नाशिकच्या सामाजिक चळवळीला मोठी हानी पोहचली आहे. त्यांची ‘वस्तीवरची पोरं’ ही मालिका आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेला कथासंग्रह विशेष गाजला होता. त्यांच्या निधनाने ‘वस्तीवरची पोरं’ पोरकी झालीत अशा शब्दात सामाजिक क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘आपलं महानगर’मध्ये रविवारी प्रसिद्ध होणार्‍या सारांश पुरवणीच्या त्या नियमीत लेखिका होत्या.

Anita Pagare
सामाजिक कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्या समता आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून अनिता पगारे सामाजिक चळवळीत सक्रिय झाल्या. या संघटनेने केवळ सामाजिक चळवळच नाही तर आयुष्याचे आत्मभान आम्हाला शिकवले, असे अनिताताई नेहमीच म्हणत. त्यामुळेच ‘अरुण ठाकूर- वसा आणि वारसा’ पुस्तकाच्या निर्मितीत त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. दिल्ली येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलन अनिता पगारे सहभागी झाल्या होत्या. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेली ‘वस्तीवरची पोरं’ ही मालिका अनेक वर्ष चर्चेत होती. याच मालिकेचा कथासंग्रह देखील प्रसिद्ध झाला. झोपडपट्टीतील माणसाच्या जगण्याचे अनेक प्रश्न घेऊन येणार्‍या व्यथा आहेत. शहरासारख्या ठिकाणीही दलितांना गलिच्छ ठिकाणी रहावे लागते आणि गलिच्छ काम करावे लागते. त्यांच्या जगण्याचे दाहक वास्तव वस्तीवरची पोरंमध्ये मांडण्यात आले. ‘आपलं महानगर’ परिवाराशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रविवारच्या सारांश पुरवणीतील ‘जेंडर गोष्टी’ हा कॉलम त्यांचा विशेष गाजला. महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने लेखन करायच्या. समाज माध्यमांवरही त्या मोकळेपणाने विचार मांडायच्या.

- Advertisement -

Anita Pagareसंगमनेरच्या लोक पंचायत आधार केंद्रात त्यांनी परित्यक्त्या महिलांसाठी काम केले. पोलीस विभागात त्यांनी बरेच वर्ष समुपदेशक आणि प्रशिक्षक म्हणून काम केले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. याच कामाचा एक भाग म्हणून त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीतही मोठे काम उभे केले होते. राष्ट्र सेवा दलात कार्यरत असताना समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्या सातत्याने प्रयत्न करत राहिल्या.

Anita Pagareसंगिनी महिला जागृती मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. लॉकडाऊन काळात त्यांनी विविध संस्थांच्या सोशल माध्यमांवर जेंडर, विशाखा गाईड लाईन यासंदर्भात प्रशिक्षण दिले. स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठा लढा दिला होता. शालेय विद्यार्थिनींच्या मासिक पाळी संदर्भात त्यांनी जागृती अभियान हाती घेतले होते. प्रत्येक आंदोलनात, चळवळीत त्यांचा हिरिरीने सहभाग असत. अशा विविधांगी ओळखीतून दिसणार्‍या आणि या ओळखीच्या पलीकडेही जाणार्‍या अनिता पगारे यांची रविवारी सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभा करणारे मनोहर आहिरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.

- Advertisement -