महाराष्ट्राला हादरवणारी घटना, शेतातील उस पेटवून शेतकऱ्याची आत्महत्या

यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. नामदेव जाधव यांनी दोन एकर शेतामध्ये २६५ जातीचा ऊस लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. काही दिवसांपूर्वी हा ऊस तोडणीला आला होता.

महाराष्ट्राला हादरवणारी घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे. कारखाना उस नेत नसल्याने हतबल येऊन एका तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला. त्यानंतर त्या शेतातच त्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून आता अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. नामदेव आसाराम जाधव (३०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. नामदेव जाधव यांनी दोन एकर शेतामध्ये २६५ जातीचा ऊस लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. काही दिवसांपूर्वी हा ऊस तोडणीला आला होता. मात्र, परिसरातील एकही कारखाना ऊस घेऊन जात नव्हता. ऊस नेण्यासाठी नामदेव अनेक दिवसांपासून कारखान्याकडे फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना कोणत्याच कारखान्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नैराश्यात असल्याने नामदेव यांनी ऊसाचा फड पेटवून देत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ऊस पेटवल्याचं त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन सांगितले. नातेवाईकांना त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणाचेही एेकले नाही. नामदेवच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जवळपास ३० ते ४० हजार मेट्रिक टन ऊस बीड जिह्ल्यात शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.  एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा असतानाही साखर कारखाने मात्र मनमानीपणा करत आहेत. कारखाने परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रावर ऊस तोडणीविना उभा असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.