बुलढाणा – राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यातच, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज (गुरुवार) सकाळी आत्महत्या केली आहे. स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांने अनेक दिवसांपासून देऊळगावराजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता. डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं . मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्याला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते हे अतिशय दुर्दैवी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी होते. शेतीमध्ये नवनवे प्रयोग ते करत होते. त्यांच्या मृत्यूने पंचक्रोशीतून रोष व्यक्त होत आहे. जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी येत नाही आणि दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदानासाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्याला शहीदाचा दर्जा मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. युवा शेतकऱ्याने सर्व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन करुन आत्महत्या केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो शेतकरी या ठिकाणी जमल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचे पालकत्व घ्याव, सुसाईड नोटमध्ये विनंती
खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र, शेतीला पाणी मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आहे. आपल्या मुलासह कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे अशी याचना देखील सुसाईड नोट च्या माध्यमातून या शेतकऱ्याने केली आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे, असा संतप्त सूर उमटत आहेत.