मुंबई : राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. ज्यामुळे आता सध्या सरकार असो किंवा विरोधक हे प्रचार सभांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाची परिस्ठिती निर्माण झालेली आहे. या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवनावर झाला आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Farmer suicides do not stop in Maharashtra)
शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरघोस मदत करण्यात आल्याचा कांगावा नेहमीच करण्यात येतो. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याचे वारंवार सांगण्यात येते आणि याचमुळे की काय पण अपुऱ्या मदतीमुळे कायमच शेतकऱ्यांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागतो. पण यामुळे शेतकरी थेट मृत्यूला कवटाळत आपली जीवनायात्रा संपविण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे आता शेतकरी आत्महत्यांबाबतची अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 427 तर 10 महिन्यांमध्ये दोन हजार 366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
हेही वाचा… Mumbai News : कोस्टल रोड-वरळी सी लिंकला जोडणारा 136 मीटर लांबीचा गर्डर मार्गस्थ
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अपुरा पाऊस पडल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीचे पाणी आटले असून ग्रामीण भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ज्यामुळे अनेक भागांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण हे पाणी अपुरे असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पण एकीकडे टँकरने होणारा पाणीपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात देखील पुरेसा नसल्याने शेतकऱ्याने शेतीसाठी कोणते पाणी वापरावे? किंवा शेतीसाठी कुठून पाणी आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडल्याने उत्पादन घटले आहे, तर काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. राज्यातील हवामा चक्र बदलत असल्याने शेतकरी नापिकी, अवकाळीमुळे वाया गेलेले पीक, शेतमालाला न मिळणारा बाजारभाव, शेती करण्यासाठी घेतलेले कर्ज यामुळे नैराश्येत गेला आहे. पण याशिवाय देखील शेतकऱ्यांच्या मागे मुलांचे शिक्षण आणि इतर घरगुती कारणे देखील नैराश्यात जाण्यासाठी आहेतच, त्याचमुळे शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्येचा मार्ग निवडून आपल्या जीवनाचा शेवट करत आहे. ज्यामुळे आता शेतकरी आत्महत्येची अधिकृत आकडेवारी समोर आल्याने बळीराजाच्या आत्महत्या थांबणार कधी? असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.
हेही वाचा… Salman Khan : ट्रिपल इंजिन खोके सरकारचा क्राइमला आशीर्वाद, सुप्रिया सुळेचा हल्लाबोल
यंदाच्या अर्थसंकल्पात तीनचाकी सरकारकडून अर्थात महायुतीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीक विमा कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कृषी विभागाला करोडो रुपयांची तरतूद अशा अनेक गोष्टी करण्यात येतात, पण या सर्व गोष्टींचा शेतकरी वर्गाला किती फायदा होतो? खरंच फायदा होतो की नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आता गेल्या 60 दिवसांमध्ये 427 शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारकडून याबाबतची दखल घेण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited By : Poonam Khadtale