शेतकऱ्यांच्या दुधावरील मलई खाणारा बोका कोण?

शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर आणि ग्राहक ज्या दराने दुध विकत घेतो, त्यामध्ये असलेला फरक कुणाच्या खिशात जातो?

Milk protest
दूध आंदोलन

मुंबईत सोमवारपासून दूध बंद… अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मात्र या निमित्ताने एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि तो म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याला लिटरमागे १९ ते २३ रुपये मिळतात आणि मुंबईकर दूध विकत घेतात ४२ रुपयांना. मग मधले १९ रुपये जातात कुठे? शेतकऱ्यांच्या दुधाची आणि ग्राहकांच्या पैशांची मलई खाणारा बोका कोण? यावार मात्र सत्ताधारी आणि विरोधक चिडीचूप बसलेले दिसतात. वर्षोनुवर्षं डोळे मिटून दूध पिणारे दलाल हे सर्वच राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने सोमवारपासून मुंबईला दूध बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निमित्ताने एक मोठा प्रश्न उभा राहिलाआहे तो स्वतः राजू शेट्टी यांची स्वाभिमानी दूध संघटना शेतकर्‍याना २२ रुपये ( गाईचे दूध ) आणि ३५ रुपये ( दूध) इतका भाव देत आहे. तेच दूध मुंबईकर ४२ रू (गाईचे ) आणि ६० रू ( म्हशीचे ) मिळत आहे. यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी मधली २० रुपयांची मलई खातो कोण खातो कोण असा प्रश्न उभा राहिला आहे. विशेष म्हणजे शेतकरी ते ग्राहक असा १० रुपये असा खर्च असताना मधल्या मध्ये १० रुपयांवर डल्ला मारला जात आहे. पण याविषयी शेट्टी काही न बोलता शेतकर्‍यांच्या खात्यात ५ रुपये अनुदान जमा झाले पाहिजे, अशी मागणी करून मुंबईकरांना वेठीला धरत आहेत.

राज्य सरकारने दुधाचा भाव २७ रुपये ठरवले

राज्य सरकारने दुधाचा भाव 27 रुपये ठरवून दिलेला असताना गोकुळ सारखे अपवाद वगळता बहुतांशी दूध संघ 17-18 रुपये दराने दूध खरेदी करीत असून त्यामुळे शेतकर्‍यांचे लिटरमागे किमान दह रुपयांनी नुकसान होत आहे. मात्र खरेदीचा भाव कमी झाला असला तरी दुधाच्या विक्रीच्या दरात कोणतीही घट झालेली नाही. मुंबईतील दुधाचे दर हे पूर्वी होते त्याप्रमानेच 42-45 रुपये लिटरच्या वरती आहेत. मग खरेदीचे भाव घटल्याने जे मधले नफ्याचे मार्जिन वाढले आहे, ते कुणाच्या खिशात जात आहे आणि त्याबाबत सत्ताधार्यासह सगळेच मूग गिळून का गप्प आहेत.

शहरी ग्राहकाने दुधाची योग्य किंमत दिल्यानंतर शेतकर्‍याला त्याचा मोबदला मिळत नसेल तर मधल्या मधे मलई हडप करणार्या दूध संघाना त्याबाबत जबाबदार धरून त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी. पण याबाबत कुणीच काही बोलायला तयार नाही. पण, अती झाले तर शहरवासीयही दुधाच्या खरेदीवर बहिष्कार टाकू शकतात आणि तसे झाले तर आंदोलनाचे हत्यार शेतकर्‍यांवरच बुमरॅग होईल त्याहीपेक्षा सर्वसामान्य शहरी माणसाची सहानुभूतीही शेतकरी गमावून बसतील असी शक्यता आहे.

अतिरिक्त दुधामुळे भाव पडले

जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे भाव पडले आहेत. यामुळे अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्याचा दूध दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे आणि शेतकऱ्यांकडून १९ ते २३ रु. पर्यंतचे दूध घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान रविवारी संध्याकाळनंतर स्वाभिमानी शेतकरी संघाने सांगली, नागपूर येथून  जाणारे दुधाचे टँकर फोडून आंदोलनाला सुरुवात केली.

लिटरमागे १० रुपयांवर डल्ला

लिटरमागे १० रुपयांवर दलालांकडून डल्ला मारला जात आहे. २३ रु. शेतकऱ्यांना मिळत असतील आणि ग्राहकांच्या खिशातून ४२ रु जात असतील तर मधल्या १९ रुपयांचा हिशोब मांडला तर ९ रु वाहतूक, कमिशन, पार्किंग, मॅनेजमेंट, प्रोसेसिंग इत्यादिवर खर्च होतात. त्यामुळे उरलेल्या १० रुपयांवर दलाल डल्ला मारतात.

राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. खासगी दुध संघावर सरकारचे नियंत्रण नाही. राज्य सरकारने तातडीने कायदा करुन खासगी संघांवर अंकुश निर्माण करावा. तसेच गुजरात आणि कर्णाटक प्रमाणे ५ रुपये भुकटी अनुदान जाहीर करावे, अशा मागणी सर्व आमदारांनी नुकतीच विधीमंडळात केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, दूध संघ ७० टक्क्यांपेक्षा अधिकचा दर शेतकर्‍यांना देतात. सरकार शुगर प्राईस कंट्रोल अ‍ॅक्टप्रमाणे दुधाचा कायदा करु पाहत आहे. पण साखर आणि दुधाची तुलनाच होणार नाही. सरकारला हा कायदा आणताच येणार नाही. १९, २० रुपयांपेक्षा अधिकचा दर देणे संघांना परवडतच नाही. महानंदलाही अधिकचा दर देता आलेला नाही, त्यांच्यावर सरकारने कोणती कारवाई केली असा सवालही पवार यांनी केला.

दलालांना सरकारने पोसले

थेट ग्राहक ते शेतकरी अशी साखळी असावी, अशी आमचीही इच्छा आहे. यामुळे दलालांना आळा बसेल. पण या बोक्यांना पोसण्याचे काम सरकार करत आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सतत आवाज उठवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

-रविकांत तुपेकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्याक्ष.

शहरी ग्राहकांचा काय दोष?

दूध उत्पादकांच्या तोट्याला शहरी ग्राहक मुळीच जवाबदार नसताना आंदोलक नेते दुधाचा पुरवठा तोडून त्यांची कोंडी का करत आहेत? असा सवाल जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केला आहे. शहरी ग्राहकाने दुधाची योग्य किंमत दिल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नसेल तर मधल्यामध्ये मलई हडप करणाऱ्या दूध संघांना त्याबाबत जवाबदार धरुन त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. असेही नारकर म्हणाले.  

आंदोलकांवर कारवाई करणार

मुंबईला दूध पुरवठा करणाऱ्यांना सरकार संरक्षण देणार आहे. यावेळी कोणी आडकाठी आणत असेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मांडली.