घरमहाराष्ट्र‘औद्योगिक क्षेत्रासाठी’च्या नोंदीने महाडचे शेतकरी आले अडचणीत

‘औद्योगिक क्षेत्रासाठी’च्या नोंदीने महाडचे शेतकरी आले अडचणीत

Subscribe

प्रवीण देरेकरांकडे मांडले गार्‍हाणे

तालुक्यातील बिरवाडी, काळीज, आमशेत परिसरातील शेतजमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ‘औद्योगिक क्षेत्रासाठी’ अशी पेन्सिलने नोंद केली असल्यामुळे शेतकर्‍यांना प्रत्यक्षात त्यांच्या जमिनीचा वापर करता येत नाही. दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रासाठीदेखील वापर केला जात नाही, त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत शेतकर्‍यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले.

या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनींवर पेन्सिलच्या आधारे ‘औद्योगिक क्षेत्रासाठी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. असा उल्लेख केला असला तरी अद्याप या जमिनींचा कोणताच औद्योगिक वापर सुरू झालेला नाही. शिवाय या जमिनींचा शेतकर्‍यांना मोबदलादेखील देण्यात आलेला नाही. या बाधित शेतकर्‍यांनी दरेकर यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. पोलादपूर दौर्‍यावर असताना त्यांनी येथील प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले. यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

- Advertisement -

१९८० मध्ये महाड औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करताना बिरवाडी परिसरातील जमिनींवर ‘औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक’ अशी नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आजतागायत या जमिनींचे संपादन करण्यात आलेले नाही किंवा कोणता मोबदलाही या शेतकर्‍यांना देण्यात आलेला नाही. मात्र सातबारा उतार्‍यावर असलेल्या पेन्सिल नोंदीमुळे शेतकर्‍यांना या जमिनीची खरेदी, विक्री, बँक तारण, बिनशेती, घर बांधणीसाठी वापर करता येत नाही. प्रांतांनी तातडीने कार्यवाही करून या नोंदी काढून टाकाव्यात, अशी मागणी बाधित शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रमुख मागणी बरोबरच बिरवाडी ग्रमपंचायत हद्दीमध्ये गावठाण क्षेत्र वाढवून देण्यात यावे, भूमीहीन झालेल्या शेतकर्‍यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, बिरवाडी शहरातील सांडपाण्यासाठी कायमस्वरुपी विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, ‘एमआयडीसी महाड’ ऐवजी ‘एमआयडीसी बिरवाडी’ असे नामकरण करण्यात यावे, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनाची प्रत दरेकर यांना देण्यात आली. त्यांनी प्रांत विठ्ठल इनामदार, तहसीलदार पवार यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि बाधित शेतकर्‍यांना गेल्या ३० वर्षांपासून झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन देत चुकीच्या नोंदी रद्द करण्यासाठी कार्यवाहीच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी शेतकरी विनोद पारेख यांच्या समवेत कृष्णा घाग, मधुकर शेडगे, प्रमोद पारेख, बाबू म्हामुणकर, इक्बाल माटवणकर, अशोक कदम, यशवंत म्हामुणकर, मधुकर भोसले आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -