घरमहाराष्ट्रभरपाई सुरू तरी अनेक शेतकर्‍यांना अद्याप प्रतीक्षा!

भरपाई सुरू तरी अनेक शेतकर्‍यांना अद्याप प्रतीक्षा!

Subscribe

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍याला भरपाई म्हणून शासनाकडून हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तालुक्यात 3 हजार 221 बाधित शेतकर्‍यांपैकी 888 जणांच्या खात्यात ही रक्कम वळती झाली असली तरी 2 हजार 333 शेतकरी अद्याप भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

परतीच्या पावसाने शेतातील भाताचे उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3 हजार हेक्टर असून, यावर्षी 2 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 14 शे हेक्टर भातशेतीच्या नुकसानीचा आकडा पंचनाम्यानंतर समोर आला. मधल्या काळात सत्ता नाट्यामुळे नुकसानभरपाई वेळेवर मिळणार की नाही याची चिंता बळीराजाला सतावत होती, परंतु कृषी विभागाचे पुणेस्थित संचालक अनिल बनसोडे यांनी तालुक्यासह कर्जत परिसरात पाहणी दौरा केल्याने पंचनाम्यांना वेग आला. संचालकांच्या आदेशानंतर ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाने 142 गावांतील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. नुकसानभरपाई म्हणून 29 लाख 23 हजार 600 रुपये मिळाले आहेत.

- Advertisement -

हेक्टरी 8 हजार रुपये मदत तुटपुंजी असून, आणखी मदत मिळणे आवश्यक आहे. अद्याप सर्व शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही.
– नीलेश जोगावडे, शेतकरी

खालापूर तालुक्यातील 3 हजार 221 शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठविले होते. त्यापैकी 888 शेतकर्‍यांना थेट मदत मिळाली असून, त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. उर्वरित मदत लवकर मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडे शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून सव्वाकोटी रुपयांची मदत मिळावी असा प्रस्ताव दिला आहे. – कल्याणी मोहिते, नायब तहसीलदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -