हिंगोली : गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात दोन शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हिंगोली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या कार्यक्रमात दोन शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. दोन महामार्गांचे लोकार्पण गडकरींच्या हस्ते होत आहे. रामलीला मैदानावर आयोजित याच कार्यक्रमात दोन शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गडकरींचे भाषण सुरू असताना दोन शेतकरी उठून उभे राहिले. त्यांनी काही घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्र्यांना ते काही प्रश्न विचारु इच्छित होते. यामुळे संपूर्ण सभेचे लक्ष्य त्यांच्याकडे वळाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शेतकऱ्यांना सभास्थळापासून दूर नेले.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासनाने आमच्यावर अन्याय केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या संबंधीची तक्रार आणि निवेदन केंद्रीय मंत्री गडकरींना देण्याची त्यांची मागणी होती. गडकरींचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच, दोन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरु केली. मंचाच्या समोरच हे शेतकरी बसलेले होते. पोलिसांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेत त्यांना उचलून बाहेर नेले.

हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१ चे लोकार्पण नितीन गडकरींच्या हस्ते झाले. त्याआधी गडकरी नांदेड येथील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले.

शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांच्या उन्नतीवरच समाजाचा विकास
रस्ते, महामार्गाचे देशात जाळे निर्माण होत आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी करावा. त्यासाठी काही मुलभूत कामे तसेच संशोधन करुन सामान्य जनतेच्या समस्यांवर मार्ग काढावा असे आवाहन गडकरींनी केले. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी या घटकांच्या उन्नतीवरच समाजाचे कल्याण अवलंबून असल्याचे गडकरी म्हणाले.
शुक्रवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २५व्या दीक्षांत समारंभात गडकरींनी मनोगत व्यक्त केले.

गडकरींचा मराठवाडा दौरा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हिंगोली येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील वाशिम-पांगरे या ४२.३० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पावर १,०३७.४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
त्याआधी गडकरींच्या हस्ते परभणीत ७५ किलोमीटर लांबीच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. परभणीतील या महामार्गांसाठी १,०५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.