घरताज्या घडामोडीआता मोबाईल ॲपद्वारे पिकांची होणार नोंदणी

आता मोबाईल ॲपद्वारे पिकांची होणार नोंदणी

Subscribe

राज्यातील शेतकऱ्यांना आता मोबाईल Appद्वारे पिकांची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने शेतकऱ्यांसाठी App विकसित केले असून त्यामुळे तलाठ्यांकडून पीक पाहणी अचूक नोंदवली जाणार आहे. महसूल विभागाच्या रिअल टाईम नोंदणी सुविधेची माहिती विभागाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली. या ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्ट पासून राज्यभर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. हा आक्षेप स्वतंत्र अप्लिकेशन निर्मितीमुळे दूर होणार आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील, असे थोरात म्हणाले.

- Advertisement -

पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार असल्याने त्यात पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे ही शक्य होईल, असे थोरात म्हणाले.

ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर २० तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

- Advertisement -

ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -