राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. शिवाय, शेतकऱ्यांनाही या पूरस्थितीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. अतिवृष्टी होऊन बराच कालावधी उलटून गेला तरी, अद्याप मदत मिळाली नाही. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सातत्याने हल्लाबोल केला. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (farmers get the aid money from 15 September says dcm devendra fadnavis)
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आम्ही तातडीने दौरा केला. त्यानंतर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यंदा 121 टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे, 2 ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत आणि एनडीआरएफपेक्षा दुप्पट अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
“गोगलगाय आणि अन्य कारणांमुळे नुकसान झाले. ते निकषात बसत नसले तरी गुलाबी बोंडअळी वेळी जसा वेगळा GR काढून मदत केली, तसाच वेगळा GR काढून मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, 15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल केला होता. तसेच, शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो. मात्र, मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. “सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे”, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
हेही वाचा – अखेर ‘रायगडा’वर रवींद्र चव्हाणांची स्वारी, मंत्र्यांचे बंगलेवाटप जाहीर