घरताज्या घडामोडीNisarga Cyclone: 'शहापूर-मुरबाडमधील शेतकऱ्यांना १० कोटींची नुकसान भरपाई द्यावी'

Nisarga Cyclone: ‘शहापूर-मुरबाडमधील शेतकऱ्यांना १० कोटींची नुकसान भरपाई द्यावी’

Subscribe
निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे भाजीपाल्याबरोबरच घरांचेही मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने शासकीय निकषानुसार नुकसानभरपाई न देता सहानुभुतीने निर्णय घेऊन, शहापूर-मुरबाडमधील शेतकऱ्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.

निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी खासदारांनी ही मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स रुममधून ठाणे जिल्ह्यातील भाजपाचे आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, कुमार ऐलानी, मनसेचे राजू पाटील, अपक्ष गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आदी सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने चक्रीवादळाचा शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील आदिवासीबहूल भागाला फटका बसला. तेथील सर्व शेतकऱ्यांचे भाजीपाल्याबरोबरच घरांचे नुकसान झाले. राज्य सरकारच्या मदतीच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत दिल्यास, त्यांची घरे लगेचच पूर्ण होणार नाहीत. त्यांना पावसाळ्यात उघड्यावरच राहावे लागेल. तरी याबाबत राज्य सरकारने सहानुभुतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. शासकीय आकडेवारीनुसार, १०० हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. मात्र, या वादळाने शेतकऱ्यांचे भविष्यातील उत्पन्नही बुडणार आहे. तरी केवळ प्रत्यक्ष भाजीपाल्याच्या नुकसानीचा मदत देताना विचार करू नये. तर शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्नानुसार मदत द्यावी, अशी मागणी पाटील यांनी दिली. या मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -