घरमहाराष्ट्रएक्सर्बियाविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

एक्सर्बियाविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

Subscribe

जिल्हा प्रशासनाची लाज चव्हाट्यावर

बेकायदेशीर जमीन मोजणी आणि बिनशेती प्रकरणी कर्जत तालुक्यातील मानिवली खाड्याचापाडा येथील संतप्त शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, एक्सर्बिया व प्रशासनाविरोधात सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजत असलेल्या या प्रकरणात अक्षम्य चुका आणि दुर्लक्ष करणार्‍या भूमी अभिलेख, जिल्हा प्रशासन यांची लाज चव्हाट्यावर आली आहे. विद्युत केबल, बोगस मोजणी, बिनशेती प्रकरणी यापूर्वीच अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडलेला एक्सर्बिया हा खासगी व्यावसायिक गृहप्रकल्प अधिकच अडचणीत आला आहे.

नेरळ-कळंब मार्गावर वरईनजिक, तसेच कळंब-वांगणी मार्गावर पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील खाड्याचापाडा या खेड्यालगत एक्सर्बिया हा खासगी व्यावसायिक गृहप्रकल्प वसलेला आहे. या प्रकल्पाकरिता आसपासच्या शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करण्याचे सत्र गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. मात्र 19-3 सर्व्हे क्रमांकाची जागा खरेदी केलेली नाही. ती जागा परस्पर सर्व्हे कब्जेदारांना विश्वासात न घेता ताब्यात घेण्यात आल्याची तक्रार स्थानिक शेतकर्‍यांनी केली होती. यापैकी येथील सर्व्हे क्रमांक 19/3 ही जागा मालू बाळू डायरे या शेतकर्‍याची असताना रमेश हेमराज विकमानी या इसमाने भूमी अभिलेखमधील भूकर मापक यू. डी. केंद्रे यांना आणि काही स्थानिक दलालांना हाताशी धरून बोगस जमीन मोजणी करून सदर जागा ताब्यात घेतली असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे.

- Advertisement -

ही जागा बोगस दस्तऐवज सादर करून जिल्हाधिकार्‍यांकडून बिनशेती करून घेतल्याबद्दल गोविंद मालू डायरे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर जागेवर एक्सर्बियाने आपली आर्थिक ताकद वापरून बिनशेती आणि बांधकाम, विकास इत्यादी परवानग्या मिळवल्या असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सदर जागेबाबत लीज पेंडंसी दाखल असतानाही ही जागा एक्सर्बियाकडे हस्तांतरित कशी झाली, याबाबत शेतकर्‍याने आपले आक्षेप नोंदवले आहेत. आपल्या हक्कासाठी भांडणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांवर फौजदारी खटले दाखल केले, यापैकी अनेक खटले पुराव्याअभावी निकालात निघाले आहेत.

गेली 12 वर्षांपासून या जमिनीसाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. सर्व मोजण्या बोगस असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आम्ही यापूर्वी आमच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. काहीही प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे आमच्या हक्काच्या जमिनीसाठी आम्ही बेमुदत उपोषण करीत आहोत.
-गोविंद मालू डायरे, तक्रारदार शेतकरी, मानिवली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -