घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांसाठी खुशखबर; पुढच्या २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पुढच्या २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार

Subscribe

शेतकऱ्यांना पुढील १५ ते २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत केली आहे.

खरीप हंगाम २०१९ साठी राज्यातील ४७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. आता या शेतकऱ्यांना पुढील १५ ते २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत केली आहे. तसेच रब्बी पीक विम्यासाठी राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ९ वेळा निविदा काढूनही एकही खासगी किंवा शासकीय कंपनी विमा उतरविण्यासाठी पुढे आली नाही. या दहा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या धर्तीवर मदत देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नाही

मागच्या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची मदत मिळाली नसल्याचा प्रश्न काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर, डॉ. वजाहत मिर्झा यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भुसे म्हणाले की, ‘राज्यातील १.२६ कोटी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज सादर केला होता, त्यातील ४७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. पिक विम्याच्या एकूण १ हजार ९७१ कोटींपैकी राज्य सरकारचा १ हजार ७१७ कोटींचा वाटा सरकारने दिला आहे. पीक विम्याच्या निकषांप्रमाणे १२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना ३४४ कोटी ८७ लाख विम्यांची रक्कम देण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सात लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे ४९८ कोटींचे वाटप झाले आहे, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

तर भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी रब्बी पीक विम्यासाठी राज्यातील दहा जिल्ह्यात एकही कंपनी पुढे आली नसल्याचा प्रश्न तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या प्रश्नाला देखील दादा भुसे यांनी एकत्रच उत्तर दिले. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये सहा वेळा निविदा मागवूनही एकही विमा कंपनी येथे आली नाही. अशा जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या सहकार्याने त्यांच्या निकषानुसार मदत केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


हेही वाचा – ठाण्यातील चोरीच्या घटनांचा तपास कासवगतीने; ठाणेकरांची सुरक्षा रामभरोसे

- Advertisement -

 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -